सध्या राज्यसभेची निवडणूक रंगत चालली आहे. कोणताही दगा फटका होऊ नये याकरता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. याकरता तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक हॉटेल ट्रायडेंट येथे मंगळवारी, ७ जून २०२२ रोजी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २७ नोव्हेंबर २०१९ या दिवसाची आठवण ताजी झाली आहे. या दिवशी तिन्ही पक्षांनी हॉटेल ट्रायडेंट येथे एकत्र येऊन बहुमताचा आकडा सिद्ध करून सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला होता. त्याआधी काही दिवस हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या आमदारांचा एकत्रित मुक्काम होता. आता राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तेच हॉटेल, आकड्यांचाच फॉर्म्युला आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या एकजुटीचा नारा देण्यात येणार आहे.
हॉटेल ट्रायडेंट पुन्हा आले चर्चेत
सध्या दोन्ही काँग्रेसचे आमदार हॉटेल रिट्रीट येथे मुक्कामासाठी आहेत. हे सर्व आमदार मंगळवारी, ७ जून २०२२ रोजी हॉटेल ट्रायडंट येथे गेले. याठिकाणी संध्याकाळी ७ वाजता महाविकास आघाडीच्या पक्षांची बैठक होणार आहे. त्यावेळी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मलिकार्जून खर्गे यांची एकत्रित बैठक होणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हॉटेल ट्रायडेंट चर्चेत आले आहे. जेव्हा २०१९ची विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसच्या आमदारांना हॉटेल ट्रायडेंट येथे एक आठवडा ठेवण्यात आला होता. त्यामुळे हॉटेल ट्रायडेंट चर्चेत आले होते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी हॉटेल ट्रायडेंट चर्चेला आले होते, आता राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून यावेत याकरता मतांची बेगमी करण्यासाठी येथे तिन्ही पक्षांची एकत्रित सल्लामसलत सुरु आहे.
Join Our WhatsApp Community