१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांची माहिती

177
१९९१ साली जेव्हा भारतात आर्थिक मंदी आली, तेव्हा केवळ १५ दिवस पुरेल इतकीच परकीय गंगाजळी आपल्याकडे शिल्लक होती. अशावेळी या संकटातून मनमोहन सिंह यांनी नव्हे, तर रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर एस. व्यंकटरमण यांनी भारताला तारले, अशी माहिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ सत्रात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाहक राजेंद्र वराडकर, सहकार्यवाहक स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले की, रिझर्व्ह बँक ही एक अशी संस्था आहे, जिच्यामुळे भारताचा आर्थिक डोलारा टिकून आहे. वेळोवेळी आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे कार्य ती करीत आहे. अशीच एक घटना १९९१ मध्ये घडली. त्यावेळी भारतावरील आर्थिक मंदीचे संकट गडद झाले होते. केवळ १५ दिवस पुरेल इतकी परकीय गंगाजळी शिल्लक होती. त्यामुळे आपण डिफॉल्टर लिस्टमध्ये जाण्याच्या रांगेत होतो. परिणामी जगातला कुठलाही देश आपल्याला कर्ज कर्ज द्यायला तयार नव्हता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक कर्ज नाकारत होते. त्यामुळे आपल्याकडे पैसे उभे करण्याचा कोणताही दुसरा स्रोत उरला नव्हता.
त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर एस. व्यंकटरमण यांनी सोने गहाण ठेवून पैसे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे भारत आर्थिक संकटातून तरला आणि राज्यकर्त्यांचे डोळेही उघडले. त्यानंतर मनमोहन सिंह अर्थमंत्री म्हणून आले. मधल्या काळात तीनचार महिने गेले आणि जुलै महिन्यात त्यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला. तो ऐतिहासिक ठरला होता, अशी माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.