भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिंदे-फडणवीसांची राज ठाकरेंशी जवळीक वाढू लागली आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे गट आणि मनसेची युती होणार का, अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु, युतीचा घटक असलेल्या रामदास आठवले यांच्या गोटात यामुळे अस्वस्थता वाढली असून, मनसेसोबत युती नकोच, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा-शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राज यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले होते. अलीकडे शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या दीपोत्सव मेळाव्यातही शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते. त्यामुळे या सर्व भेटीगाठी म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत तर नाहीत ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, रामदास आठवले यांनी त्यास विरोध केला असून, मनसे सोबत युतीची गरज नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरेंच्या वाढत्या जवळीकीमुळे रामदास आठवले अस्वस्थ आहेत का, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
काय म्हणाले आठवले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गेले असले, तरी राज ठाकरे ‘एनडीए’मध्ये येणार नाहीत. आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेवर आरपीआय, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीमध्ये आवश्यकता नाही, असे रामदास आठवले माध्यमांशी बोलताना म्हणाले.