रिपब्लिकन पक्ष म्हणतो, ‘भाजपचाच महापौर आणि आमचा उपमहापौर होणार!’

121

सन २०१२च्या निवडणुकीदरम्यान शिवशक्ती – भिमशक्ती करत शिवसेना – भाजप युतीसोबत निवडणूक लढवणाऱ्या रिपाइं आठवले गटाला साबारेड्डी बोरा यांच्या रुपाने केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते, तर २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत खातेही खोलता न आलेली रिपाइं म्हणते येत्या महापालिका निवडणुकीत आमचे २५ नगरसेवक निवडून येतील.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागा असे आवाहनच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असून आमचा उपमहापौर होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

सर्व जाती धर्मियांचा पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा विक्रोळी येथे झाला. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ईशान्य मुंबईत 1992 च्या महापालिका निवडणुकीत रिपाइंचे ७ नगरसेवक निवडून आले होते, तर संपूर्ण मुंबईत रिपाइंचे १२ नगरसेवक त्या काळात निवडून आले होते. रिपब्लिकन पक्ष आता केवळ बौद्धांचा आणि एका जातीचा राहिला नसून सर्व जाती धर्मियांचा पक्ष झाला आहे. संपूर्ण देशात रिपब्लीकन पक्ष पोहोचला आहे. झोडपट्टीवासियांचे, गरिबांच्या नोकरीचे, घराचे प्रश्न रिपब्लिकन पक्ष सोडविण्यात अग्रेसर आहे.

( हेही वाचा : मुंबईत कोविडच्या ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ८९ टक्के रुग्ण! )

आठवलेंचे आवाहन

आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय युती होणार असून, सत्ता आल्यास पहिली अडीच वर्षे रिपाइंचा उपमहापौर, तर भाजपचा महापौर होईल. तसेच नंतरची अडीच वर्षे रिपाइंचा महापौर होईल, असे भाजप सोबत ठरले असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले. तसेच २३६ पैकी रिपब्लिकन पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आले पाहिजेत त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.