मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर शिवसेनेतील 40 आमदारांनी शिंदे गटाची स्थापना केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जाहीर सभांपासून ते थेट विधीमंडळापर्यंत उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. 50 खोके, एकदम ओके, अशी घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली.
याच टीकेला शिंदे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून, शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. खोके घेण्याची सवय आदित्य ठाकरेंनाच असल्याची टीका रामदास कदम यांनी जाहीर सभेत केली आहे.
आदित्य ठाकरेंची पोलखोल करणार
दापोलीत झालेल्या शिंदे गटाच्या जाहीर सभेत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. आदित्य ठाकरेंनाच 100 खोके घेण्याची सवय असून त्यांची लवकरच पोलखोल करणार असल्याचा इशाराही रामदास कदम यांनी यावेळी दिला आहे.
काकाच्या पाठीत खंजीर खुपसला
प्रदूषण नियंत्रक महामंडळाचे 100 कोटी रुपये आदित्य ठाकरे यांनी घेतले आहेत. त्याचं काय झालं याची चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे 100 खोके कसे आणि कुठून घ्यायचे हे त्यांना माहीत आहे. अडीच वर्षात कधीही हे बाहेर पडले नाहीत. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री. काका काका म्हणून माझ्याकडून सर्व खातं समजून घेतलं आणि काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. यामागचं वास्तव मी सर्वांसमोर आणणार आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community