रामदास ‘कदम’ ह्यांचे अश्रू म्हणजे कदम कदम ‘घटाए’ जा…

91

काही वर्षांपूर्वी कोणत्यातरी वर्तमानपत्रात एका लहानश्या कॉलमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती की शिवसेनेच्या एका बैठकीत रामदास कदम तावातावाने उद्धव ठाकरेंच्या अंगावर धावून गेले. ही बातमी वाचून मी दोन स्वाभाविक असे अंदाज लावले. एकतर रामदास कदम यांचं शिवसेनेतील राजकीय अस्तित्व कमी होणार आणि ठाकरे या नावाचा आता दरारा उरला नसून बविष्यात त्यांना खूप मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार. या दोन्ही शक्यता आता खर्‍या ठरलेल्या आहेत.

आता ठाकरेंनी रामदास कदम यांची हकालपट्टी केल्यानंतर कदम मीडियासमोर आले आणि ते खूपच भावूक झाले होते. कदम म्हणाले, ‘छगन भुजबळ फुटले तेव्हा मी संघर्ष केला. नारायण राणे फुटले तेव्ही मी संघर्ष केला. राज ठाकरे फुटले तेव्हा मी संघर्ष केला. हकालपट्टी करताना आमच्या संघर्षाची आठवण ठेवा. उद्धव साहेब तुम्ही हकालपट्टी केली नाही मी राजीनामा दिला. मी माझ्या मनातून तुम्हांला काढलंय. ५२ वर्षे काम करणाऱ्या एका शिवसैनिकावरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आपण आत्मपरिक्षण केलं पाहिजे.’

हे स्टेटमेंट करताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले. ‘उद्धव साहेब आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात. ५१ आमदारांची हकालपट्टी केली. उद्या १२ खासदार जातील त्यांची हकालपट्टी कराल. शेकडो नगरसेवकाची हकालपट्टी केली. आता मातोश्रीवर बसून तुम्हांला केवळ हकालपट्टी करणं एवढंच काम राहिले आहे का? ही परिस्थिती का आली याचं आत्मपरिक्षण करा. मागील अडीच वर्षात शिवसेना संपवण्याचं काम पवार काका-पुतण्यांनी केलं आणि त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले. असंही ते म्हणाले.

रामदास कदम यांचे हे वक्यव्य अतिशय महत्वाचे आहे. भुजबळ, राणे, राज ठाकरे गेल्यानंतर त्यांनी संघर्ष केला. याचा अर्थ यांच्या विरोधात रामदास कदम उभे राहिले. हे तिन्ही मोठे नेते होते. राणेंचा प्रचंड दरारा होता. शिवसेनेच्या इतर नेत्यांमध्ये राणेंना आव्हान द्यायची हिंमत नव्हती. राज ठाकरेंकडे डोळे वर करुन देखील बघण्याची कुणाची छाती झाली नाही. अशा वेली रामदास कदम यांनी ते आव्हान स्वीकारले असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. या बंडखोर शक्तिंना सामोरं जाऊन आपण शिवसेना वाचवली आहे हा संदेश रामदास कदम यांना द्यायचा आहे.

म्हणून हकालपट्टी केल्यानंतर ते भावूक झाले. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी शून्य मेहनत घेतली ते सर्व उच्च पदावर बसले आणि जे बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढले ते बाजूला सारले गेले, ही खंत कदम यांनी बोलून दाखवली. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील सत्ता काबीज करण्यासाठी व आबाधित ठेवण्यासाठी असा लोकांची निवड केली जे कर्तृत्वशून्य होते. याचा त्रास कर्तृत्ववान लोकांना झाला. त्यामुळे रामदास कदम यांचे अश्रू म्हणजे एक संदेश आहे की जेव्हा एखादा पक्ष कुटुंबाच्या आहारी जातो, तेव्हा तिथे कर्तृत्वाला महत्व प्राप्त होत नाही तर चापलूसीला महत्व प्राप्त होतं. चापलूसी करणारे पुढे जातात आणि सत्य बोलणारे व चुका दाखवणारे मागे राहतात. किंबहुना त्यांची वाईट दशा केली जाते. असा वेळी कर्तृत्ववान माणसाला कदम कदम बढाए जा म्हणजे पुढे आता येत नाही तर सपशेल माघार घ्यावी लागते. ही परिवार वादी पक्षाची दैना आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.