रामदास कदमांनी ‘या’ ५ कारणांमुळे उद्धव ठाकरेंना केला ‘जय महाराष्ट्र’!

73

शिवसेनेची एकेकाळची तोफ म्हणून ज्यांची ओळख होती असे रामदास कदम यांनी अखेर उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का समजला जात आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात यावरून मोठी चर्चा सुरु झाली आहे. यामागील आता कारणमीमांसा सुरु झाली आहे.

२०१९मध्ये तिकीट कापले 

अडचणीच्या काळात रामदास कदम यांनी शिवसेनेचे विधिमंडळात नेतृत्व केले होते आणि कोकणात नारायण राणेंच्या दहशतीशी दोन हात केले होते. त्यामुळे रामदास कदम हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी जवळचे होते. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर जुन्या नेत्यांकडे पाठ करण्यात येऊ लागली, त्यामध्ये रामदास कदम हे एक होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना खेडमधून उमेदवारी नाकारली. त्याऐवजी रामदास कदमांचा मुलगा योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली. एकप्रकारे ‘तुम्ही आता थांबले पाहिजे’, असेच नेतृत्वाला कदम यांना सुचवायचे होते. आपल्याला डावलल्याचा राग रामदास कदम यांच्या मनात होता. तसेच जर महाविकास आघाडी कायम राहिली असती तर त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्याविरोधात तेथील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दगाफटका करुन त्यांना पाडले असते. तसेच परब यांनीही योगेश कदम यांच्याविरोधात रसद पुरवली असती, असा संशय रामदास कदम याना होता.

(हेही वाचा युरोपात तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहचणार! उष्णतेच्या लाटेने मृत्यूचे तांडव होणार?)

विधान परिषदेतही नाकारले 

विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतरही रामदास कदम यांना पुन्हा विधान परिषदेत संधी देण्यात आली नाही. अशा प्रकारे रामदास कदम यांना निवडणुकीच्या राजकारणातून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वेगळे केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन बदललेल्या समीकरणाशी अर्थात एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घेणे रामदास कदम यांनी पसंत केले.

बाळासाहेबांनंतर दुर्लक्ष केले 

जोवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ह्यात होते, तोवर कोणताही मोठा निर्णय घेताना ते शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेत्यांशी चर्चा करायचे. त्यात रामदास कदम हे नक्की असायचे. रामदास कदमांच्या शब्दाला शिवसेनेत वजन होते, परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या माघारी शिवसेना नेतृत्व आपल्याला विचारात घेत नाही. आपल्या शब्दाला किंमत देत नाही. कोणताही निर्णय घेताना कल्पना देत नाही, असे आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.

(हेही वाचा राज्यात ‘मॅक्सी कॅब’ला एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध)

रामदास कदमांचा आवाज केला बंद 

शिवसेनेवर जी संकटे आली, त्या वाईट काळात रामदास कदम शिवसेनेचा आक्रमकपणा कायम ठेवून संघर्ष करत राहिले. राज्यातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे. शिवसेनेचा गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. रामदास कदमांच्या शब्दाला ‘मातोश्री’त महत्व होते. परंतु गेली तीन वर्षे ‘मातोश्री’ने बोलण्यावर बंधने घातली. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात रामदास कदम म्हणतात, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावर कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कुणी काही बोलले तरी आपण माध्यमांसमोर अजिबात बोलायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचे कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही, असे रामदास कदमांना म्हटले.

अनिल परबांच्या मतदारसंघात हस्तक्षेप 

दोन्ही काँग्रेससोबत शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून रामदास कदम नाराज होते त्यांच्यात उद्धव ठाकरेंना असे सरकार स्थापन न करण्यास सुचवले होते. यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार अनिल परब यांचे ‘मातोश्री’ दरबारी वजन वाढले. गेल्या ३ वर्षांपासून उद्धव ठाकरेंबरोबर अनिल परब सावलीसारखे असायचे. त्याचवेळी अनिल परब यांचे राजकीय वर्तुळ विस्तारत होते. अनिल परब यांचा दापोली मंडणगडमध्ये वरचेवर हस्तक्षेप वाढत होता जे रामदास कदम यांचे राजकीय कार्यक्षेत्र आहे. पहिल्यांदा परब-कदम यांच्यात अंतर्गत संघर्ष झाला. नंतर मात्र त्याचा मोठा स्फोट होऊन कदम यांच्यावर परबांच्या रिसॉर्ट प्रकरणाची कागदपत्रे सोमय्यांना दिल्याचा गंभीर आरोप झाला. त्यात पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याचे वृत्त आले. तेव्हापासून मागील दीड वर्षांत रामदास कदम शिवसेनेच्या कोणत्याही जाहीर मेळाव्यात उपस्थित राहिले नाही. शिंदे गट निर्माण झाल्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही ते गैरहजर राहिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.