रामदास कदमांना पुन्हा आमदारकी मिळण्याची शक्यता कमी! कारण काय?

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

107

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ८ जागांपैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांची धाकधुकी वाढली आहे. कदमांच्या आमदारकीची मुदत संपली आहे. त्यांच्यावर पक्षांतर्गत कट कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप झाला आहे. हे प्रकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे कदम यांच्याविषयी पक्षात नाराजीचा सूर आहे. त्याचा परिणाम म्हणून रामदास कदम यांना पुन्हा विधान परिषदेची आमदारकी मिळेल याची शक्यता कमी दिसत आहे.

रामदास कदमांवर आरोप

शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीत बेकायदेशीररित्या रिसॉर्ट उभारले आहे, त्यासंबंधी कागदपत्रे कदम यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुरवली, असा आरोप जेव्हा झाला, तेव्हा रामदास कदम यांच्या आवाजाची कथित ऑडिओ क्लिपही जाहीर झाली होती. मात्र कदम यांनी हा आरोप फेटाळला. तसेच सेनेशी मी एकनिष्ठ असल्याचे  सांगितले. दसरा मेळाव्याआधी ६ पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून त्यांंनी खुलासाही केला. मात्र असे असले तरी पक्षप्रमुखांच्या नाराजीला कदम यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.

(हेही वाचा : एसटीच्या मागे साडेसाती! मागील १० वर्षांत किती वेळा झाला संप?)

कोणकोणत्या सदस्यांच्या जागा रिकाम्या?

शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसचे भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा. तसेच, भाजपाची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूरमधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही.

काय आहे निवडणूक कार्यक्रम?

अधिसूचना जाहीर – १६ नोव्हेंबर, अर्ज दाखल करण्याची तारीख – २३ नोव्हेंबर, अर्जाची छाननी – २४ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २६ नोव्हेंबर, मतदान – १० डिसेंबर, मतमोजणी १४ डिसेंबर.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.