ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची रविवारी शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या खेडे येथील बालेकिल्ल्यात जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवरून रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना एक खोचक सवाल केला.
‘सभेत खेडची लोकं किती होती?’
खेडमधून पत्रकार परिषद घेत रामदास कदम म्हणाले की, ‘खेडमधील सगळा विकास हा रामदास कदम यांनी केला आहे. म्हणून खेडची ओळख रामदास कदम यांचा बालेकिल्ला अशी झाली आहे. हे उद्धवजींना कदाचित माहित नसेल, पण शिवसेना प्रमुखांना माहित होतं. शिवसेना प्रमुख, मातोश्री वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला स्वतः आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वरुढ पुतळा आम्ही भरणे नाक्याला उभा केलाय. त्याचंही उद्घाटन शिवसेना प्रमुखांच्या हस्ते झालं होत. आणि ज्या, ज्या वेळेला मी खेडमधून विजयी झालो, त्या त्या वेळेला मां साहेबांनी स्वतः मला आरतीने ओवाळलं आहे. मातोश्री ही माझ्यासाठी नवीन नाही. पण काल जो इथं राजकीय शिमगा झाला, त्यामध्ये खेडची लोकं किती होती? मुंबई, ठाणे, पुणे, नवीन मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून सगळी लोकं आणली गेली. आणि रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात सभा घेतल्याचं समाधान उद्धवजींना नक्की झालं असेल. आता किती खुर्च्या खाली होत्या? लोकं कशी उठून जात होती? याच्यावरती इतक्या खालच्या पातळीला मी येणार नाही.’
‘बाळासाहेब गेल्यानंतर माझ्या सगळ्या सभा, भाषणबाजी बंद करून टाकली’
पुढे रामदास कदम म्हणाले की, ‘पण एक गोष्ट मला उद्धवजींना सांगायला हवी, एकदा नाही, तर १०० वेळेला खेडमध्ये आलात, तरी योगेश कदमाला तुम्ही पाडू शकणार नाही. माझा मुलगा योगेश कदमाला संपवायला तुम्ही प्रचंड प्रयत्न केलात. मला तर तुम्ही राजकारणातून संपवणारच होता. मला कोणत्याही माध्यमासमोर जायचं नाही, असं सांगितलं होत. मला बंदी घातली होती. आज महाराष्ट्राला एक गोष्टी कळू देत, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. मी पुस्तक लिहिणार आहे. अयोध्याला ज्यावेळेस उद्धवजी निघाले होते, तेव्हा सर्वांची राहण्याची वगैरे व्यवस्था रामदास कदम यांनी केली होती. याला संजय राऊत साक्षीदार आहेत. पण अदाल्या दिवशी उद्धवजींनी मला बोलवून अयोध्याला तुम्ही माझ्यासोबत यायचं नाही, असं सांगितलं. मला कळलं नाही का ते? तुम्ही माध्यमासमोर जायचं नाही, हे कळलं नाही का ते? बाळासाहेब गेल्यानंतर माझ्या सगळ्या सभा, भाषणबाजी बंद करून टाकली, मला कळलं नाही का ते? ज्या, ज्यावेळेला उमेदवारांचे फोन यायचे की, रामदास कदमांची आम्हाला सभा हवी. त्या, त्या वेळेला शिवसेना भवनमधून सांगण्यात यायचं की, तेवढं नाव सोडून दुसरं काहीही बोला. मला कळलं नाही का ते?’
जर हे सिद्ध केलेत…
‘उद्धवजी तुमच्या चेहरा अतिशय भोळा दिसतो. पण त्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत, याचा साक्षीदार मी आहे. हे मी जवळून पाहिलं आहे. तुमची नसनस मी ओळखतो. काल तुम्ही सुरुवातच केलीत की, केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होता. त्यामुळे उद्धवजी जर तुम्ही, मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो हे सिद्ध केलेत, तर तुमच्या घरी मी भांडी घासायला येईन. नाहीतर उद्धवजी तुम्ही माझ्याघरी भांडी घासायला याल का?’ असा सवाल करत रामदास कदमांनी ठाकरेंना आव्हान दिलं.
(हेही वाचा – फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उडवली खिल्ली; म्हणाले, नाकाखालून ४० लोकं निघून गेल्याचा…)
Join Our WhatsApp Community