शिवसेना शिंदे गटातील नेते, खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) आणि माझ्यातील वाद आता मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपला पक्ष नवीन आहे, आपल्याला पुढे चांगली कामगिरी करायची आहे, ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाला यश आले आहे, अशा वेळी पक्षांतर्गत आरोप – प्रत्यारोप करून वातावरण बिघडू नका, असे म्हटले आहे. त्यामुळे आपण या वादावर पडदा टाकत आहे, जर गजानन कीर्तिकर यापुढे बोलले तर मीही गप्प राहीन, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रामदास कदम माध्यमांशी बोलत होते.
मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा जागेसाठी रामदास कदम यांनी आपला मुलगा सिद्धेश कदम हा उमेदवार असेल असे म्हणत दावा केला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून खासदार गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात वादाचे फटाके फुटत आहेत. रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर टीका करताना थेट त्यांच्या खासगी जीवनावर टीका केली. पक्षातील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेत गजानन कीर्तीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर वर्षावर रामदास कदम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले की, आमच्यातील वादावर पडदा पडला आहे. गजानन कीर्तीकर यांनी थेट प्रेस नोट काढण्यापेक्षा मुख्य नेत्यांसोबत चर्चा करावी असेही कदम यांनी म्हटले. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत आणि भविष्यात पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ असेही कदम यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)
ज्याची जळते त्यालाच कळते
गजानन कीर्तीकरांच्या खासगी आयुष्यावरून केलेल्या टीकेचे रामदास कदम यांनी समर्थन केले. खासगी टीका करणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदमवर गद्दारीचा आरोप करणे हे कितपत योग्य आहे, रामदास कदमला संपवण्यासाठी प्रेसनोट काढणे किती योग्य असा प्रश्नच कदम यांनी केला. 30 वर्षानंतर मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला, हे आता कळले का? ज्याची जळते त्याला कळते अशा शब्दांत आपली खदखद व्यक्त करत कदम (Ramdas Kadam) यांनी आता वाद संपला असल्याचे म्हटले.
Join Our WhatsApp Community