राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही अटी- शर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आणि जामिनासाठी दाम्पत्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
( हेही वाचा भोंगा हा महत्त्वाचा मुद्दा नाही, रझा अकादमीसारख्या संघटना खरी समस्या; भाजपची भोंग्याच्या वादात उडी )
मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन
कोर्टाच्या व्यस्त कामकाजामुळे आणि अपु-या वेळेमुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत या प्रकरणाचा निकाल वाचन पूर्ण होणार आहे. त्यामुळे बुधवारी निकाल देण्याची शक्यता आहे. अखेर न्यायालयाने निर्णय देत राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.
अटींची पुर्तता केल्यास तुरुंगातून सुटका
मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपप्रकरणी राजद्रोहाच्या कलमाखाली २३ एप्रिलपासून अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला अखेर दिलासा मिळाला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा व अपक्ष आमदार रवी राणा यांना विशेष कोर्टाने विविध अटी घालून जामीन मंजूर केला. प्रत्येकी ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेचे हमीदार देण्याच्या अटीची पूर्तता केल्यानंतर तुरुंगातून सुटका होणार आहे.
न्यायालयाने घातल्या या अटी
प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून घालण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community