अमरावतीत राणा दाम्पत्याचे जोरदार शक्तिप्रदर्शन

158

हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून जेलवारी करावी लागलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे अमरावतीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. या वेळी राणा दाम्पत्याचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक करण्यात आला. मुंबई येथे ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर करताच राजद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवस कारागृह कोठडीला सामोरे गेलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे तब्बल ३६ दिवसांनी शनिवारी अंबानगरीत दाखल झाले. डीजे, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे, गाड्यांचा ताफा अशा शक्तिप्रदर्शनाने त्यांनी वेगळीच छाप उमटविली. नागपूर ते अमरावती प्रवासातही समर्थक व हनुमानभक्तांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

(हेही वाचा – आता Mumbai-Pune एक्स्प्रेस वेवर अपघात होण्याची चिंता नाही, कारण…)

शनिवारी सायंकाळी पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर जयस्तंभ चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. राजकमल चौकात जंगी स्वागत झाले. दसरा मैदानालगत संकटमोचन हनुमान मंदिरात त्यांनी चालिसा पठण केले.

रहाटगाव येथे राणा दाम्पत्यांचे आगमन होताच बाळू इंगोले यांनी १५ फूट लांब गुलाब पुष्पाचा हार चक्क क्रेनद्वारे आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या गळ्यात घातला. यावेळी जय श्रीराम, पवनसुत हनुमान की जय अशा नाऱ्यांनी आसमंत दणाणून गेला. राजकमल चौकात राणा दाम्पत्यांचे समर्थकांनी क्रेनद्वारे ३५० किलो वजनाच्या हाराने अभूतपूर्व स्वागत केले. राणा दाम्पत्य हात उंचावून नागरिक, व्यापारी, दुकानदारांना, वाहनचालकांना अभिवादन करीत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.