काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याबाबत गांधींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपने काँग्रेसचे भारत जोडो आंदोलन बंद करण्याची मागणी केली असताना, आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यामध्ये राहुल गांधींना अटक करण्याची मागणी सावरकर यांनी केली आहे.
राहुल गांधींना अटक करण्याची मागणी
सावरकर बॅरिस्टर होते,त्यांना जर का पैसे कमवायचे असते तर त्यांनी लाखो रुपये कमावले असते. पण तरीही त्यांनी हे सुखी जीवनाचा त्याग करुन सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी शिक्षा सोसली. 13 वर्ष स्थानबद्धता आणि 14 वर्षांचा कारावास अशी 27 वर्षे शिक्षा भोगलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव राजनेते आहेत. अशा थोर क्रांतिकारकाचा राहुल गांधी यांनी घोर अपमान केला आहे. त्यामुळे मी सावरकरांचा नातू म्हणून राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली असल्याचे रणजित सावरकर यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.
(हेही वाचाः ‘मी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नाही, पण…’, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया)
गांधींचीही अशी अनेक पत्रे आहेत
इंग्रजांच्या सगळ्या रेकॉर्ड्समध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे डेंजरस माणूस असल्याची नोंद आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचे पत्र वाचून दाखवले तो त्यांच्या मूर्खपणाचा कळस आहे. पत्राचा मायना आणि शेवट लिहायची एक पद्धत असते. सावरकरांनी इंग्रज सरकारला लिहिलेल्या पत्राच्या शेवटी मोस्ट ओबेडियंट सर्व्हंट असे लिहिले आहे. त्याचे मै आपका नौकर हूँ, असे हिंदी भाषांतर राहुल गांधी यांनी करुन दाखवले.
पण गांधींनी देखील इंग्रज सरकारला अनेक पाठवली आहेत. त्यामध्ये गांधींनीही मोस्ट ओबेडियंट सर्व्हंट म्हणून सही केली होती. त्यामुळे राहुल गांधी हे भारतीयांची दिशाभूल करत असून त्यांच्या या विधानांना बळी पडू नका, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community