राहुल गांधींच्या विरोधातील मनसेच्या आंदोलनानंतर रणजित सावरकर-ठाकरे भेट, भेटीत काय घडले?

117

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. मनसेनेही आक्रमक भूमिका घेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. याबाबत रणजित सावरकर यांनी राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानले.

( हेही वाचा : शरद पोंक्षेंचे थेट सेल्युलर जेलमधून राहुल गांधींना आव्हान, एक दिवस तरी सावरकरांच्या यातना भोगून दाखव!)

कॉंग्रेसच्या राहुल गांधींनी १६ नोव्हेंबर रोजी वाशीम येथील जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितली, तसेच सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार हिंदुस्थानविरुद्ध काम करीत होते, असे विधान केले. त्यानंतर राज्यभरातून त्याविरोधात तीव्र पडसाद उमटले. भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि सावरकर प्रेमींनी ठिकठिकाणी आंदोलने करीत निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत, राहुल गांधी यांना शेगाव येथील सभेत काळे झेंडे दाखवून विरोध प्रदर्शित करा, असा आदेश दिला. त्यानंतर मनसेचे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते शेगावला पोहोचले. पोलिसांनी रोखल्यानंतरही मनसैनिकांनी गनिमिकावा करीत गांधींना काळे झेंडे दाखवले. सावरकरांच्या अवमानाविषयी ठोस भूमिका घेतल्याबद्दल राज ठाकरे आणि मनसैनिकांचे आभार मानण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांनी राज यांची भेट घेतली.

भेटीत काय चर्चा झाली?

राज यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रणजित सावरकर म्हणाले, सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेत मनसेने आंदोलन केले. त्यांनी थेट शेगावात धडक मारली. त्यांना पोलिसांनी मध्यात अडवले, तरिही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत पोहोचले आणि त्यांनी धैर्याने निषेधाचे झेंडे फडकवले. त्यासाठी राज ठाकरे यांना धन्यवाद देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.