स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका बाईपायी देशाशी विश्वासघात केला, असा गौप्यस्फोट स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी शुक्रवारी केला. ब्रिटिश अधिकारी लॉर्ड माऊंट बॅटन यांच्या पत्नी एडविना आणि नेहरू यांच्यात झालेला पत्रव्यवहार केंद्र सरकारने मागवून घ्यावा आणि जनतेसमोर जाहीर करावा. तेव्हा आपल्याला कळेल की, ज्यांना आपण चाचा नेहरू म्हणतो, त्यांनी देशाची कशी फसवणूक केली, विश्वासघात केला, असेही ते म्हणाले.
( हेही वाचा : राणीबागेत आता ऑनलाईन तिकीट नोंदणी : अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण)
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आरोपांची पोलखोल करण्यासाठी रणजित सावरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. सावरकर म्हणाले, लॉर्ड वेव्हेलनंतर लॉर्ड माऊंट बॅटन यांना भारतात पाठवायचे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे नेहरूंना सिंगापूरला बोलावून घेण्यात आले. तेथे ते लॉर्ड माऊंट बॅटन आणि लेडी माऊंट बॅटन यांचे पाहुणे म्हणून गेले. त्यानंतर माऊंट बॅटन यांनी म्हटले होते, त्या दिवसापासून आमची तिघांची मैत्री सुरू झाली आणि ती तिघेही मरेपर्यंत टिकली. ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी आपल्या आत्मचरित्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, लॉर्ड माऊंट बॅटन यांची निवड करण्यात त्यांच्या हुशारीसोबतच, त्यांच्या पत्नीची पर्सनॅलिटी आणि इतरांवर छाप पाडण्याची वृत्ती याचाही सहभाग होता.
मार्चच्या मध्यंतराला माऊंट बॅटन भारतात आले. त्यांनी ७२ दिवसांत भारताच्या फाळणीची योजना आखली. ती नेहरुंकडून त्यांनी व्यक्तिगतरित्या मंजुर करून घेतली. कॉंग्रेसकडून ऐनवेळी दगाफटका व्हायला नको यासाठी त्यांनी नेहरुंसोबत शिमल्याला खासगी दौरा केला. त्यात लॉर्ड माऊंट बॅटन, लेडी माऊंट बॅटन, पामेला माऊंट बॅटन आणि नेहरू सहभागी झाले. त्या चार दिवसांत काय जादू झाली माहिती नाही, नेहरुंचा ‘नर्व्हस ब्रेकडाऊन’ संपला आणि पूर्ण कॉंग्रेसला अंधारात ठेवून फाळणीची योजना मान्य झाली. व्हॉइसरॉय पर्सनल रिपोर्ट क्रमांक – ७, १५ मे १९४७ मध्ये त्यासंबंधातील वर्णने आहेत, असेही सावरकर यांनी सांगितले.
पामेलाच्या पुस्तकातील सत्यकथन
नेहरू आणि एडविना बॅटन (माऊंट बॅटन यांची पत्नी) यांच्यातील संबंधांचे वर्णन खुद्द त्यांची मुलगी पामेला बॅटन हिने आपल्या पुस्तकात केले आहे. ती म्हणते, आम्ही १५ महिने भारतात राहिलो, त्यादरम्यान माझी आई आणि नेहरू यांच्यात आकर्षण आणि प्रेमाचे संबंध तयार झाले. माझ्या वडिलांना काही कामे करून घ्यायची असतील, तर ते आईला सांगायचे, तू हे जवाहरकडून करून घे. पुढे पामेला लिहिते, नेहरू रोज रात्री २ नंतर माझ्या आईला पत्र लिहायचे. त्याची सुरुवात आणि शेवट अत्यंत आकर्षक शब्दांत असायचा. मध्यल्या परिच्छेदांमध्ये त्यांनी दिवसभरात काय केले, कुणाला भेटले, त्याची रोजनिशी असायची. हे सतत १२ वर्षे सुरू होते. भारताच्या पंतप्रधानांनी मरेपर्यंत एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्नीला आपल्या दैनंदिन कामकाजाची माहिती द्यावी, हा विश्वासघात नाही का. याचा अर्थ नेहरू १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटनला पाठवत होते. त्यांचे वारसदार राहुल गांधींनी याचे उत्तर द्यावे, असे सावरकर म्हणाले.
नेहरूंचा ‘तो’ पत्रव्यवहार खुला करा
नेहरू सतत १२ वर्षे रोज रात्री २ वाजता लेडी माऊंट बॅटन यांना पत्र लिहून भारतातील सर्व घडामोडी कळवायचे. त्यांच्यातील पत्रव्यवहाराची माहिती उपलब्ध आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, नेहरू-एडविना पत्रव्यवहार ब्रिटनकडून मागवून घ्यावा आणि तो जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली.
Join Our WhatsApp Community