दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या शिवाजी पार्कच्या सभेच्या संबंधीचा टिझर काँग्रेसने प्रसिद्ध केला. त्यात कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करण्यासाठी लिहिलेल्या ‘इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं’, या गीतातील दोन कडवी दाखवून त्यांनी त्या जागी राहुल गांधी यांना ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवतार आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत निंदनीय, क्लेशकारक आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या माणसाची काय लायकी आहे, हे देश जाणून आहे, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी खडेबोल सुनावले. तसेच अशा माणसाची केवळ शिवाजी पार्क येथे सभा होते म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे प्रमोट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र त्यावर मौन बाळगूण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान मूग गिळून सहन करत आहेत, हे दुर्दैवी आहे, असेही सावरकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची राजकीय मजबुरी
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेच्या संबंधी एबीपी माझाला रणजित सावरकर यांनी मुलाखत दिली, त्यावेळी ते बोलत होते. राहुल गांधी हे वीर सावरकर यांच्यावर अनेक वर्षे टीका करत आहेत. २०१९ मध्ये याच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राहुल गांधी यांना मी जोड्याने मारेन. त्यानंतरही राहुल गांधी यांनी टीका करणे सुरूच ठेवले. राजकीय पातळीवर कुणी कुणाशी युती करावी यावर मी बोलणार नाही. जेव्हा शिवसेना-काँग्रेस युती झाली तेव्हाही मागच्या वर्षी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वारंवार वीर सावरकर यांच्यावर अपमानास्पद टीका केली आहे. अशा परिस्थितीत शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांची सभा होणार आहे, त्याआधी उद्धव ठाकरे यांनी किमान राहुल गांधी यांना वीर सावरकर यांचा अवमान केला म्हणून माफी मागायला भाग पाडले पाहिजे होते. पण त्यांनी तसे केले नाही, कदाचित त्यांची राजकीय मजबुरी असेल, असेही रणजित सावरकर म्हणाले.
मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न
राहुल गांधी यांनी सावरकर यांची अजिबात माफी मागितली नाही. ते वीर सावरकर यांच्यावर टीका करतील की नाही माहित नाही, कारण त्यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये असंतोष आहे. वीर सावरकर यांच्यावरील टीका जनता कधीच सहन करणार नाही. त्यामुळे काँग्रेसवाले कधीच हे सहन करणार नाहीत. मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात याच शिवाजी पार्कवर जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारा आंदोलन केले होते, त्यानंतर मणिशंकर अय्यर यांना मुंबई पाऊल ठेवू दिले नव्हते. अशी शिवसेना वीर सावरकर यांच्यासाठी लढणारी होती, त्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सभेत सामील होत आहेत. इथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर आहे. अशा ठिकाणी राहुल गांधी यांची सभा आयोजित करून राष्ट्रभक्त माणसाच्या, मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसेची भूमिका योग्यच
ज्या बाळासाहेबांनी वीर सावरकर यांच्या सन्मानासाठी भूमिका घेतली, त्यांच्या समाधीस्थळाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा आहे. समोर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे. अशा ठिकाणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जर पुन्हा वीर सावरकर यांच्यावर टीका केली तर मला वाटत नाही कुठलाही मराठी माणूस हे सहन करेल. त्यामुळे जर राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अवमान केला, तर त्यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही, अशी मनसेने जी भूमिका घेतली ती योग्यच होती.
Join Our WhatsApp Community