एक सहाय्यक पोलीस निरीक्षक जो १६ वर्षे निलंबित होता, ७ दिवस कारागृहात होता, त्याला पोलीस सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकला होता, मात्र फडणवीस यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार आले आणि लगेचच सचिन वाझे याला त्यांनी सेवेत सामावून घेतले. त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी खंडणी वसुली सुरु केली, असा आरोप महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी, २२ मार्च रोजी संसदेत केला.
एकट्या मुंबईतून १०० कोटी, तर राज्यातून किती वसूल करत असतील?
जर अशा पद्धतीने खंडणी वसूल करण्याचे काम सुरु झाले, तर संपूर्ण देशात हा प्रकार होऊ शकतो. राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच हे सगळे सुरु आहे. बदल्या करणे, खंडणी वसूल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?, अशी विचारणा खासदार राणा यांनी यावेळी केली.
(हेही वाचा : परमबीर यांचा अजून एक धक्का… सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका!)
परमवीर सिंग केंद्राचा बोलका पोपट! – विनायक राऊत
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी याविषयावर संसदेत बोलण्याची विनंती केली होती, त्यांना थोडा वेळ दिल्यामुळे राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन केंद्र सरकार आणि भाजपवर आरोप केले. परमवीर सिंग हे भ्रष्टाचाराने बरबरटले आहेत. गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी अतिरिक्त पोलीस सचिव यांना परमवीर सिंग यांच्या विरोधात सविस्तर लिहिले होते, भारत शहा आणि जितेंद्र चंदुलाल नवलानी यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांनी डांगे यांना त्रास दिला, रात्री पब बंद करायला गेले असता रात्री २ वाजता परमवीर सिंग यांनी फोन करून केस रजिस्टर न करण्यास सांगितले. त्यावेळी चंदुलाल नवलानी यांनी ‘आमचे परमवीर सिंग यांच्याशी घरचे संबंध आहेत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ’, असे म्हटले. त्यानंतर डांगे यांना परमवीर सिंग यांना त्रास देणे सुरु केले, असे खासदार राऊत म्हणाले. परमवीर सिंग यांनी त्यांना दिलेले सर्व त्रास डांगे यांनी सविस्तरपणे पोलीस डायरीत नमूद केले आहेत, असेही राऊत म्हणाले. परमवीर सिंग हे कायम राजकारणात लूडबूड करायचे असे ज्युलिओ रिबेलो, सुरेश खोपडे यांनी म्हटले आहे. सिंग हे केंद्र सरकारचा बोलका पोपट आहे, असा आरोपही खासदार राऊत यांनी केला.
Join Our WhatsApp Community