पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीसाठी केंद्राचा दोष नाही, दानवेंचा अजब दावा

105

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणं कठीण झाले आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यातील राज्यकर्ते या इंधन दरवाढी विरोधात आंदोलनं करतात, परंतु पेट्रोल आणि डिझेलचे दर हे केंद्र सरकार ठरवत नाही तर अमेरिका ठरवते, असा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तर भारतातील वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीबाबत केंद्राला दोष देऊ नका, असेही ते म्हणाले.

…त्यामुळे केंद्राला दोष देणं चुकीचं

देशातील इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने सोमवारी मोर्चा काढला होता, यावर बोलत असताना रावसाहेब दानवे यांनी हा नवा दावा केल्याचे समोर आले आहे. देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, पण यावर काही बोलणं योग्य नाही असे सांगत दानवे म्हणाले की, “पेट्रोलचे दर हे आता जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहेत. त्यामुळे या किंमती वाढण्यामागे केंद्र सरकारचा कोणताही हात नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या रोज कमी-जास्त होतात. या किंमती आता अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यावरुन दोष देणं चुकीचे आहे.”

(हेही वाचा – …यामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता? )

केंद्र सरकारच्या पैशावर देश चालतो…

यापुढे बोलताना रावसाहेब दानवे असेही म्हणाले की, केंद्र सरकारने आपला पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केला आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला कर कमी करत नाही. त्यामुळे लोकांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.