काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पी.पी. माधवन हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. माधवन यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माधवन यांच्याविरोधात 26 वर्षीय पीडित महिलेने उत्तम नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पीडितेने दाखल केली तक्रार
पीडित महिलेला नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून पी.पी.माधवन यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे. तसेच त्यानंतर पीडितेला धमकी देखील देण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत असून, अद्याप त्यांनी यासंदर्भात अधिकृतरित्या काहीही स्पष्टता दिलेली नाही. या महिलेची पती काँग्रेस पक्ष कार्यालयात काम करत होता. काँग्रेस पक्ष कार्यालयात होर्डिंग्ज लावायचे काम महिलेचा पती करत होता. त्याचा 2020 मध्ये मृत्यू झाला.
गुन्हा दाखल
25 जून 2022 रोजी पीडित महिलेने दिल्लीतील उत्तम नगर पोलिस ठाण्यात माधवन यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या 376(बलात्कार) आणि 506(गुन्हेगारी धमकी) या कलमांतर्गत माधवन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे द्वारकाचे पोलिस उपायुक्त एम.हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community