राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान 20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी ट्विट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरात कोरोनाची घुसखोरी!
दरम्यान यापूर्वी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी आदित्य ठाकरे आणि आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत रुग्णांचा आलेख वाढताच
मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साडेतीन हजारांच्यावर जावून पोहोचला आहे. मंगळवारी दिवससभरात ३,५१२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या मुंबईमध्ये २७ हजार ६७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये दिवसभरात १,२०३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख २९ हजार २३४ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ३,५१२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ६९ हजार ४२३ एवढी झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ६०० एवढ्यावर पोहोचली आहे. दिवसभरात मृत्यू पावलेल्या ८ रुग्णांपैंकी सहा रुग्ण हे दिर्घकालिन आजाराचे होते. यामध्ये पाच रुग्ण हे पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. तर मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा ०.७४ टक्के एवढा आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ९० दिवसांचा आहे. आतापर्यंत झोपडपट्टी व चाळी सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ही ३८ एवढी असून सक्रिय सीलबंद इमारतींच संख्या ही ३६३ एवढी आहे. तर लक्षणे असलेल्या ५४५ रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा : बुरा न मानो, कोरोना है!)
माहिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी सत्तरीपार!
दादर,माहिम आणि धारावी या मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागांमध्ये मंगळवारी दिवसभरात १३८ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये माहिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी सत्तरीपार झाली आहे. सोमवारी माहिममध्ये ७१ रुग्ण होते, तर मंगळवारी ७६ रुग्ण आढळून आले. दादरमध्ये दिवसभरात ३४ रुग्ण आढळून आले तर धारावीमध्ये २८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे या दोन्ही भागांमध्ये एकूण रुग्ण अनुक्रमे ५,५३९ आणि ४,४६९ एवढी झाली आहे. जी उत्तर विभागाच्यावतीने शिवाजी मंदिर, सेनापती बापट मार्ग आणि कोतवाल उद्यान आदी भागांमध्ये चाचणी घेण्यात आल्या. तिन्ही ठिकाणी एकूण १४२ लोकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये १४१ लोकांची चाचणी निगेटिव्ह आली असून कोतवाल उद्यानातील चाचणीमध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
हे विभाग आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे, या विभागात महापालिकेकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community