रत्नागिरी जिल्ह्यातील परटवणे या गावी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची बाब ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या रिपोर्टद्वारे समोर आली आहे. स्वतः स्वातंंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने ही शाळा सुरू करण्यात आली होती. पण आता मात्र या शाळेची दुरवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. या प्रकरणी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधीने थेट तेथील पालकमंत्री, उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांचे सचिव हिरेन पाटील यांनी यासंबंधी बुधवार, २० एप्रिल रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती दिली.
सावरकरांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याची शाळा साक्षीदार
या बैठकीत रत्नागिरीतील परटवणे गावातील ग्रामपंचायतसह शाळेचे व्यवस्थापक बैठकीत सहभागी होणार आहेत. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची दखल पालकमंत्री सामंत यांनी घेतली. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर, स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. त्या काळात सावरकरांनी समाजसुधारणेचे फार मोठे कार्य केले. त्यावेळी अस्पृश्यांच्या मुलांना शाळेतील इतर मुलांपासून लांब बसवण्यात येत होते. याचा फायदा घेऊन तत्कालीन मिशनरी शाळांनी अस्पृश्य मुलांच्या पालकांना भूलवून धर्मांतरणाचा डाव मांडला होता. तेव्हा मिशनरी शाळांना पायबंद घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील परटवणे येथे सर्व मुलांना एकत्र बसून शिक्षण देणारी एक शाळा सुरू करण्याची योजना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आखली होती.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष)
स्थानिक प्रशासनाकडून शाळेकडे दुर्लक्ष
भागोजी शेठ कीर यांच्या सहाय्याने ही शाळा उभारण्यात आली. आता या शाळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले आहे. ही शाळा सध्या रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीत आहे. स्थानिक प्रशासनाकडून या शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी नगर परिषदेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे, तर राज्यात सुद्धा महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना सत्तेत आहे. मातोश्रीच्या जवळचे समजले जाणा-या उदय सामंत यांच्या मतदारसंघात ही शाळा आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाकडे ठाकरे सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न आता रत्नागिरीतील जनता विचारत आहे.
Join Our WhatsApp Community