एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरून हलकल्लोळ माजला आहे. त्यासाठी हनुमान चालीसा भोंग्याद्वारे लावण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवार, २२ एप्रिलपासून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापासून मुंबईच्या रस्त्यांवर हजारो शिवसैनिक उतरले आहेत. एका अपक्ष आमदार आणि खासदाराने अवघी शिवसेना फरफटत नेली आहे, त्यामुळे मुंबईत शिवसेनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच वेळी अमरावतीतील शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
मुंबईतील शिवसेनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह
अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ हे या भागाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. अशा प्रकारे नवनीत राणा यांनी त्यावेळी शिवसेनेला धूळ चारली आहे. तेव्हापासून राणा दाम्पत्याचे या भागात अस्तित्व वाढले आहे. अशा परिस्थितीत राणा दाम्पत्य यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिले आहे. शिवसैनिकांची अस्मिता असलेल्या मातोश्री बंगल्यासमोरच हनुमान चालीसा म्हणण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आले आहे. मात्र शिवनेनेने राणा दाम्पत्याना मातोश्रीकडे येऊ न देण्यासाठी अवघे शिवसैनिक रस्त्यावर उतरवले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्य महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. मुंबईत अपक्ष राणा दाम्पत्यांसाठी सेनेला इतका संघर्ष करावा लागत आहे, यावरून सेनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्याच वेळी राणा दाम्पत्याने अमरावतीतील त्यांचे राजकीय अस्तित्व मजबूत केले आहे. यामुळे अमरावतीतील आनंदराव अडसूळ यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि राणा दाम्पत्य यांचे अस्तित्व मजबूत झाले आहे.
(हेही वाचा वर्षा सोडून मुख्यमंत्री मातोश्रीकडे का धावले?)
सेनेच्या क्षमतेवर प्रशचिन्ह
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवाच्या दिवशी जाहीर सभेत ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरावा, त्याच्या पुढे दुप्पट भोंगे लावून हनुमान चालीसा लावा, असे आवाहन केले. तेव्हापासून राज ठाकरे यांनी अवघ्या देशात हलकल्लोळ माजवला आहे. आता त्यापाठोपाठ आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सक्रिय झाले आहे. राणा दाम्पत्यांनी वर्षा बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला आव्हान दिले. त्यानंतर दोन तासांतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावरून थेट मातोश्री येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री मातोश्रीत का दाखल झाले, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.