राज्याच्या राजकारणात ‘मातोश्री’चे स्थान अढळ आहे. या ‘मातोश्री’ची ताकद केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झाली. या ‘मातोश्री’वरून आदेश येताच अवघी मुंबई बंद पडलेली आहे. क्रिकेटची खेळपट्टी उखडली आहे. अनेक चित्रपटांचे खेळ रद्द झाले आहेत आणि ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, या नाटकालाही समर्थनही दिले गेले आहे. ‘मातोश्री’ने घेतलेली भूमिका हा आपल्या देवाचाच आदेश आहे. असेच मानून शिवसैनिक अंधपणे त्या आदेशाची अंमलबजावणी करायचा. या आदेशामध्ये विधायक दृष्टिकोन आहेच, असा ठाम विश्वास शिवसैनिकांना असायचा. हा शिवसैनिक मातोश्रीसोबत इतका जोडला गेला की, मातोश्रीत येणाऱ्या शिवसैनिकाला बाळासाहेब स्वतःची शक्ती मानत असत. बाळासाहेब आणि शिवसैनिक यांच्या या अतूट नात्यामुळेच मातोश्री ही राज्याच्या राजकारणात पॉवर हाऊस बनली. पण शिवसैनिकांचे मंदिर हे गेल्या चार दिवसांपासून चर्चेत आले आहे.
मातोश्री पॉवर हाऊस!
ठाकरे कुटुंब मुंबईत आले, तेव्हा ते दादरच्या मिरांडा चाळीत स्थायिक झाले. १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. शिवसेनेच्या स्थापनेनंतर ठाकरेंना दादरचे घर अपुरे पडू लागले. त्यांच्या घरात कार्यकर्त्यांसह नेत्यांची गर्दी होऊ लागली. म्हणून बाळासाहेबांनी वांद्रे येथे तीन मजली ‘मातोश्री’ बंगला उभारला. मागील ४ दशके राज्याच्या राजकारणात मातोश्री हे केंद्रस्थानी राहिले आहे. ४० वर्षे याच बंगल्यावरून राज्याला आदेश दिले गेले. पुढे हेच मातोश्री पॉवर हाऊस बनले. इथे सर्वसामान्यांची गाऱ्हाणी ऐकली जाऊ लागली. त्यासोबत प्रत्येक जण आशेने इथे येऊ लागला. ९०च्या दशकात देशातील कोणताही नेता महाराष्ट्रात आला तरी तो ‘मातोश्री’त यायचाच. मग त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समविचारी नेतेमंडळी असो किंवा शरद पवारांसारखे विरोधक हेदेखील स्नेह भोजनासाठी यायचे. फक्त मायकल जॅक्सनलाच नाही, शत्रू राष्ट्राचा क्रिकेटपटू जावेद मियांदाद यालाही मातोश्रीत यावे लागले. अनेक सेलिब्रेटींनी मातोश्रीत हजेरी लावली. दिलीप कुमारपासून अमिताभ बच्चनपर्यंत या सर्वांना मातोश्रीबद्दल आपलेपणा होता म्हणून त्यांचे येणे जाणे असायचे. याच मातोश्रीने सुनील दत्त या अस्वस्थ वडिलाला धीर दिला होता आणि संजय दत्तला खडतर प्रसंगातून बाहेर काढले. ‘मातोश्री’त सेलिब्रेटींइतकेच सर्वसामान्यांनाही महत्व मिळाले. त्यातूनच प्रत्येक शिवसैनिकांसाठी मातोश्री मंदिर बनले.
(हेही वाचा राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन करणा-या १६ शिवसैनिकांना जामीन)
म्हणून मातोश्री शिवसैनिकांने प्रेरणा देते!
आपापसात मतभेद, वाद यामुळे एकमेकांपासून दुरावलेला शिवसैनिक मातोश्रीत यायचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होताच सगळे मतभेद दूर करत शिवसैनिक म्हणून मातोश्रीच्या वातावरणात मिसळून जायचा. म्हणून मातोश्री हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे. निवडणुकांतील तिकीटे, पक्षातील जबाबदाऱ्या यावरून जरी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या शिवसैनिकांमध्ये मतभेद निर्माण झाले, तरी ते जेव्हा मातोश्रीत येत, तेव्हा मात्र त्यांच्यातील वाद मिटून जात. शिवसेनेत ठाकरे कुटुंब, मातोश्री वगळून काहीही घडू शकत नाही. कारण हा पक्षच मुळात ठाकरे कुटुंब आणि मातोश्री यामध्ये गुंफलेला आहे. त्यामुळे मातोश्री शिवसैनिकांसाठी बलस्थान आहे. बाळासाहेबांचे निधन झाले, उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली, त्यांनी बाळासाहेबांना दिलेला शब्द पळाला आणि मातोश्री पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थान बनले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ते वर्षा बंगल्यावर गेले, तरी जेव्हा ते पक्षप्रमुखाच्या भूमिकेत येतात तेव्हा मातोश्रीत येऊन आदेश देतात. मात्र आजवर कधी मातोश्रीवर आरोप झाले नव्हते, पण विरोधकांनाही पहिल्यांदा मातोश्रीवर आरोप केले आणि शिवसैनिक आक्रमक बनले. शिवसैनिकांचा आणि नेत्यांचा या वास्तूप्रती विश्वास आजही मातोश्रीच्या भिंतींना मजबूत करत आहे. आजही शिवसैनिकांची हीच श्रद्धा आहे म्हणून हा बंगला शिवसैनिकांना प्रेरणा देत आहे.
Join Our WhatsApp Community