सध्या महाराष्ट्रावर अनेक संकटे आली आहेत, ते संकटे दूर होण्यासाठी आम्ही राणा दाम्पत्य २३ एप्रिल, शनिवारी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा वाचणार आहे, यासाठी पोलिसांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू. शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमानाच्या नामस्मरणात दम आहे, हे पाहायचे आहे. कुणी जर देवाचे नाव घेण्यासाठी मुर्दाबाद होत असतील तर रवी राणा आणि नवनीत राणा मुर्दाबाद होण्यासाठी तयार आहे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले.
हिंसा झाली तर मुख्यमंत्री, शिवसैनिक जबाबदार
सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे आमच्या या कृत्यामागे कोणताही गैर अर्थ काढू नये. आम्ही स्वतः स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे, कुणी आम्हाला राजकारण शिकवू नये, १६ तास काम केले म्हणून आम्ही निवडून आलो, असे खासदार नवनीत राणा म्हणाले. संजय राऊत हे पोपट आहे, त्यांच्यावर काय बोलणार, त्यांना एक मिरची द्या ते शांत होतील, जर तिथे काही हिंसा झाली तर त्यांची जबाबदारी मुख्यमंत्री आणि शिवसैनिकांची असेल, असेही नवनीत राणा म्हणाल्या. मागील दोन वर्षे मुख्यमंत्री घरी बसून होते, अशा प्रकारे जर कुणी घरी बसून राहिला तर त्यांना कुणी पगारही देणार नाही, त्यांच्या घरात अन्न शिजत नाही. शेतकऱ्यांच्या बांद्यावर जाऊन मुख्यमंत्री यांनी एकदाही विचारपूस केली नाही, असेही खासदार नवनीत राणा म्हणाले.
(हेही वाचा मुंबईत राणा दाम्पत्याचं ‘असं’ झालं स्वागत)
पोलिसांनी ४ वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी आम्हाला परवानगी दिली असती, मागे मी शेतकरी आंदोलनासाठी जेव्हा मातोश्री येथे आंदोलन केले होते, तेव्हा मला त्यांनी अटक केली होती. आम्हाला सरकार पोलीस विरोध करतील तरीही आम्ही तिथे जाऊ आणि शांतपणे हनुमान चालीसा म्हणणार आहे. शिवसैनिक खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक असतील तर ते आमच्यासोबत येऊन शांतपणे हनुमान चालीसा म्हणतील, असे आमदार रवी राणा म्हणाले. पोलिसांनी मला ४ वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, हनुमान चालीसा न वाचल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. म्हणून त्यांना रस्त्यावर, मातोश्रीबाहेर बसावे लागत आहेत. जर हनुमान जयंतीच्या दिवशीच हनुमान चालीसा वाचली असती, तर आज चित्र वेगळे असते, राज्यावर अनेक संकटे आहेत त्यासाठी त्यांना हनुमान चालीसा वाचण्याची गरज आहे, असे आमदार रवी राणा म्हणाले.
Join Our WhatsApp Community