सार्वजनिक बांधकाम विभागात पैशांच्या मोबदल्यात बदल्या केल्या जात असल्याचा आरोप खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. एका मंत्र्यांनेच स्वतःच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगणे. तसेच पैसे देऊन होणाऱ्या बदल्या रोखता येत नसल्याची खंत रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
नक्की रविंद्र चव्हाण काय म्हणाले?
सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यात नवीन प्रणाली आणत असल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची सोमवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रविंद्र चव्हाण यांनी विभागातील बदल्यासाठी पैसे घेतले जात असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘बदल्यासंदर्भात पारदर्शकता आली पाहिजे, असे मी वारंवार विभागात झालेल्या प्रत्येक बैठकांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाला आयुष्यात सेवानिवृत्त व्हायचे आहे. सेवानिवृत्तीच्या अगोदर असे आपण एक काही काम करू शकतो का, की आम्हाला सांगता येऊ शकत का, की हे काम मी एवढ्या वर्षेच्या सेवेमध्ये अतिशय चांगले केले, असे सांगता येईल का. असे काम येणाऱ्या काळात उभे करा. माझ्यासोबत माझे दोन्ही अधिकारी आहे, त्यांनाही या दोन्ही गोष्टींची कल्पना आहे. बदल्या आणि बदल्याच्या मधल्या स्पर्धा करू नका. आपापसात स्पर्धा करू नका. बदल्यात जे राजकारण केले जाते आहे, त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे, असे मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु दुर्दैवाने मला पाहिजे तसे यात यश येत नाही.’
…यामुळे मनाला वेदना होतात
रविंद्र चव्हाणांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी बदल्यासंदर्भात एका मराठी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्विकारत असतानाच मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो की, या विभागातील बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने पैसे घेतले जातात हे यानंतरच्या काळात करू नका. अधिकाऱ्यांनीच यामध्ये स्वतः तुम्ही मी कोणाला बदलीसाठी पैसे देणार नाही, ही भूमिका ठेवली पाहिजे. यामुळे विभाग अतिशय चांगल्यारितीने चालेल. पण वारंवार सांगूनही त्याचे दिशेने जाणे हे काही योग्य नाही. यामुळे मनाला वेदना होतात.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींवरील उद्धव ठाकरेंच्या एकेरी भाषेतील टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर; म्हणाले…)
Join Our WhatsApp Community