पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार धंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
२०२३ मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा अर्थसंकल्पात एसटीला वाटण्याच्या अक्षता; MSRTC ची झोळी रिकामीच)
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजात व्हिडिओ तयार करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते, तर कोणीही कुठे गेले नसते,” अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.
धंगेकरांचा पुन्हा धनुष्यबाण स्वीकार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना त्यांचे जोरदार कौतुक केले. “रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेता आहेत. त्यांनी आपल्या कामातून ओळख निर्माण केली आहे. २५ वर्षे नगरसेवक राहिलेले धंगेकर यांचा त्यापैकी १० वर्षांचा काळ शिवसेनेत गेला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतल्याने आता लोकांना समजेल की धंगेकर कोण आहेत. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना ४ लाख ६० हजार मते मिळाली, यातून त्यांची लोकप्रियता सिद्ध होते. पुण्यातून हजारो कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील, असा मला विश्वास आहे.
“खरी शिवसेना जनतेने मान्य केली”
“मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. लोकांनी मला हलक्यात घेतले, पण त्यानंतर जे घडले त्याची दखल ३३ देशांनी घेतली. जगाने पाहिले की एक कार्यकर्ता काय करू शकतो. शिवसेनेच्या ८० पैकी ६० आमदार निवडून आले आणि जनतेने ठरवले की खरी शिवसेना कोणाची,” असे शिंदे म्हणाले.
“शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवणार” – धंगेकर
रवींद्र धंगेकर यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले, “मी शिवसेनेचा १० वर्षे नगरसेवक होतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांत सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राने पाहिले. एक कॉमन मॅन म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.”