सोमय्यांविरोधात वायकरांचा अब्रूनुकसानीचा दावा!

एवढेच नव्हे तर लवकरच या प्रश्‍नी ते क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.

152

स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी केली जात आहे. यामुळे जनमानसातील लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलीन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

सोमय्या यांनी केला होता आरोप

अलिबाग कोर्लई येथील संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. पण त्यांच्या या सर्व निराधार आरोपांत काहीच तथ्य नसल्याचे विविध प्रसामाध्यमांनीच पुढे उघडकीस आणल्याने सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले.

(हेही वाचाः धक्कादायक! राज्यात सहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा!)

जाहीर माफी मागण्याची नोटिस

त्यानंतर महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत विविध समाजमाध्यमांद्वारे केला. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत. किरीट सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधींची आपली जनमानसातील प्रतिमा, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलीन करुन मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सोमय्या यांना वायकर यांनी नोटिसद्वारे दिला होता.

क्रिमीनल दावाही दाखल करणार

अखेर आमदार रविंद्र वायकर यांनी स्वत:च्या फायद्यासाठी नाहक बदनामी करणार्‍या किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रुपये १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच या प्रश्‍नी ते क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.