एसटी कर्मचा-यांसाठी रयत क्रांती संघटना मैदानात

पंचायती राज समितीच्या नांदेड दौऱ्यावर असताना रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व आमदार सदाभाऊ खोत यांनी नांदेड जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आणि कामगार वर्ग यांची नांदेड बस आगार येथे भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सरकारला एसटी कर्मचा-यांसाठी वेळ नाही

सदाभाऊ खोत म्हणाले की, एसटी कर्मचारी व कामगार वर्ग हे कोण्या आमदार खासदार, कलेक्टरच्या घरातून वाहक-चालक होत नसून ते गोरगरीब, कष्टकरी वर्गातून येत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राज्यातील प्रलंबित असलेले 12 आमदाररुपी सरदार नियुक्तीसाठी राज्यपालांना भेटायला वेळ आहे, पण या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे पहायला व त्यांच्यासाठी योग्य निर्णय घ्यायला वेळ नाही. तुमच्यातील तुमचे सहकारी चालक कमलाकर भिकन बेडसे जि. धुळे, वाहक एस.एस. जानकर जि. नांदेड, वाहक मनोज चौधरी जि. जळगाव यांनी या एसटी महामंडळाच्या अनियमित वेतनाला व कमी पगाराला कंटाळून आत्महत्या केल्या.

तुमच्यासाठी सभागृह बंद पाडेन

हे बलिदान आपण वाया जाऊ देऊ नये, यासाठी आपल्यातील जेवढ्या संघटना आहेत त्यांनी एकत्रित या, रयत क्रांती संघटना तुमच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरायला तयार आहे. तसेच येणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील तुमचा प्रश्न राज्याच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे विधिमंडळात मोठ्या ताकदीने मांडेन आणि वेळ पडल्यास तुमच्या प्रश्नांवर सभागृह देखील मी बंद पाडेन, असे आश्वासित केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, शेतकरी पुत्र संघटनेचे बालाजी ढोसणे, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष गुणवंत मिसलवाडी इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here