Maharashtra Budget बद्दल सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतात? वाचा सविस्तर प्रतिक्रिया

24
Maharashtra Budget बद्दल सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतात? वाचा सविस्तर प्रतिक्रिया
Maharashtra Budget बद्दल सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतात? वाचा सविस्तर प्रतिक्रिया

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget ) दि. १० मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडला. त्यानंतर अर्थसंकल्पावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया दिल्या हे जाणून घेऊया.

हे तर ‘चॅम्पियन बजेट’: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मांडण्यात आलेल्या राज्य अर्थसंकल्पाला ‘चॅम्पियन बजेट’ असे संबोधले आहे. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधांचा समतोल राखत, सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी म्हटले. शिंदे म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड सुरू असून, हा प्रवास थांबणार नाही, असा निर्धार अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ते, पूल, बंदरे आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या तरतुदी केल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी आघाडीवर राहील.”

तसेच मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची दीड ट्रिलियन डॉलर्स योगदान क्षमता असून, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी अपप्रचार केल्याचे सांगत, या योजनेसाठी अर्थसंकल्पात ३६,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. “गरिब, दुर्बल महिलांना केवळ आर्थिक मदत नाही, तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीही तरतुदी केल्या आहेत,” असे ते म्हणाले. “विकास हाच आमचा अजेंडा आहे. महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी न्याय देणारा अर्थसंकल्प : मंत्री आकाश फुंडकर

राज्याचा अर्थसंकल्प शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करणारा आहे, असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी सांगितले. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवून कामगार व कष्टकरी वर्गाला सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र एका नव्या पर्वाकडे वाटचाल करत असून, हा अर्थसंकल्प त्या दिशेने बळकट पाऊल आहे. कामगारांसाठी कल्याणकारी योजना, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.शेती आणि उद्योग क्षेत्राच्या विकासावर भर देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल, असा विश्वासही मंत्री फुंडकर (Akash Fundkar) यांनी व्यक्त केला.

समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा ध्यास : शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प समृद्ध महाराष्ट्राच्या वाटचालीला गती देणारा आणि प्रगतीचा ध्यास घेणारा आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी ३,०९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच महिला, बालके, युवक, गरीब आणि वंचित घटकांवरही या अर्थसंकल्पात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा, निवारा, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही मंत्री पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोध पक्षाच्या नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांची व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

महायुती सरकारने सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसणारा आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा आहे. महायुतीने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापनेच्या वेळीही या योजनेची अंमलबजावणी अर्थसंकल्पात करू, असे सांगण्यात आले. मात्र, आता प्रत्यक्षात त्या योजनेचा कुठेही उल्लेख नाही. यामुळे राज्यातील लाखो महिलांची घोर फसवणूक झाली आहे.राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्ष अर्थसंकल्पात कर्जमाफी किंवा कोणत्याही योजनांसाठी निधी वाढवलेला नाही, असेही दानवे म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून कोणतीही ठोस तरतूद नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.

“सेव्हन हेवन” अर्थसंकल्प सादर; सर्वसामान्य लोकांची थट्टा : जयंत पाटील

हा फक्त श्रीमंतांसाठी पूल आणि टनेलचा सपाटा असलेला ‘सेव्हन हेवन’ अर्थसंकल्प असून, सामान्य जनतेला फसवणारा आहे. जे श्रीमंत आहेत, गाड्यांमध्ये फिरतात, त्यांच्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पूल आणि टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.शिवभोजन योजनेचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही, त्यामुळे ही योजना बंद करण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट दिसतो. ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरही भर नाही, कारण आता निवडणुका संपल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayant Patil ) यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.