सावरकरवाद्यांनी एकत्र येण्याची गरज!

101

आपल्या देशामध्ये अनेक लोकोत्तर महात्मे जन्माला आले. परंतु आपलं दुर्दैव असं की हिंदू समाजात सहज फूट पडते. आता राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर टीका केली. काही दिवसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल विधान केलं. त्यानंतर सावरकरांवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण देता येणार नाही व जणू सावरकर आणि महाराज हे दोघे वेगळ्या विचारांचे होते असा आव आणला गेला आणि सेक्यूलर म्हणवून घेणार्‍या लोकांना या मुद्द्यावरुन का होईना, पण पुन्हा एकदा हिंदुंमध्ये फूट पाडता आली.

( हेही वाचा : बोलीभाषा एकांकिका स्पर्धा जाहीर! ९ ते ११ जानेवारीला प्राथमिक फेरी )

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानाचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांचं वेगळेपण म्हणजे अनेक वर्षांच्या परकीय आक्रमणानंतर पहिल्यांदा प्रादेशिक किंवा संकुचित विचार न करता शिवाजी महाराज नावाचे दिव्यपुरुष भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकतेसाठी लढले. त्यांनी हिंदुस्थानाला ही जाणीव करुन दिली की हा देश आपला आहे. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. त्यामुळे भारतीयांच्या मनात महाराजांबद्दल खूप आदर आहे. खरं पाहता महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. कारण आपण सगळे त्यांचाच तर वारसा चालवत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर देखील छत्रपतींचा वारसा चालवत होते, त्यांच्या मार्गावरुन चालत होते. म्हणून सावरकर शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असू शकत नाही, तर ते एका अर्थी शिवाजी महाराजांचे भक्त होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देवासमोर मुघल आदी बाह्य शत्रूंना हाकलून लावून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेतली, त्यांचा आदर्श घेऊन सावरकरांनी आपल्या कुलदैवतेसमोर भारताला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली. म्हणून सावरकर वेगळ्या विचारांचे होते असं म्हणता येत नाही. सावरकर हे महाराजांच्या मार्गावरुन चालणारे होते. हिंदुंमध्ये सहज फूट पाडली जाऊ शकते हे स्वयंघोषित पुरोगाम्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे राज्यपालांच्या विधानामुळे त्यांच्याकडे आयती संधी चालून आली. राज्यपालांचे विधान अर्थातच चुकीचे होते. पण त्यांनी शिवाजी महाराजांना कालबाह्य म्हटलं नाही. तर बोलण्याच्या ओघात त्यांनी जुन्या जमान्यातील आदर्श असा शब्द वापरला. त्यात त्यांनी नितिन गडकरी हे नव्या जमान्यातील आदर्श असल्याचे म्हटले. राज्यपालांचे हे विधान चुकीचे आहे. नितिन गडकरी हे सुसंस्कृत नेते जरुर आहेत परंतु त्यांना लगेच शिवाजी महाराजांच्या पंक्तीत बसवण्याची घाई नको.

आता मुद्दा असा की राज्यपालांची जरी चूक झाली असली तरी त्यांचा हेतू शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा नव्हता. राहुल गांधींनी मात्र मुद्दाम सावरकरांचा अपमान केला आहे. त्यांनी बर्‍याचदा हे विधान केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा हेतू सावरकरांचा अपमान करण्याचा होता. या दोघांमधील अंतर आपण समजून घेतले पाहिजे आणि लबाड पुरोगाम्यांच्या नादी लागून आपल्यातील एकी संपुष्टात आणू नये. यासाठी सर्व सावरकरवाद्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. लक्षात घ्या जे सावरकरवादी आहेत, त्यांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. कारण सावरकरांनी शिवाजी महाराजांचा, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा” अशा शब्दांत गौरव केला आहे.

सावरकर आणि महाराज हे वेगळ्या विचारांचे नाहीत तर शिवबांनी जो विचार भारताला अर्पण केला तो विचार सावरकर पुढे घेऊन गेले आहेत आणि हा विचार संपुष्टात यावा यासाठी स्वयंघोषित पुरोगामी कटकारस्थान रचत आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दिव्य विचारांमुळेच आपण १९४७ ला स्वतंत्र झालो आहोत. आपला देश आज पुढे पुढे जातोय, विकास करतोय. म्हणून हा विचार पुसून टाकला तर देशाचे तुकडे होतील आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांचा हेतू साध्य होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात काही बोलता येत नाही हे जाणून स्वयंघोषित पुरोगाम्यांनी इतिहासाची मोडतोड केली आणि शिवाजी महाराजांना प्रांतापुरतं, जातीपुरतं आणि एका संकुचित विचारांपुरतं मर्यादित ठेवलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे हिमालयापेक्षाही मोठे आहेत. त्यांना मर्यादित ठेवता येत नाही. जगात जितके मोठे योद्धे जन्माला आले, मग सिकंदर, नेपोलियन इ. या सर्वांपेक्षा शिवाजी महाराज प्रचंड मोठे आहेत.

वाचकांनो, राम समजून घेण्यासाठी हनुमान व्हावं लागतं. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं मन असावं लागतं. त्याशिवाय या महापुरुषाला आपण कसे समजून घेणार. कारण सावरकरांनी हनुमंतासारखी छत्रपतींची सेवा केली आहे. त्यांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी सावरकरांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे. म्हणून आपण सावरकरांच्या दृष्टीने महाराज समजून घेतले पाहिजेत. कृपया छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या हिमालयापेक्षाही उंच प्रतिभा असलेल्या महापुरुषाला संकुचित करु नका. शिवाजी महाराज हे जगाच्या अभ्यासाचे केंद्र झाले पाहिजेत. सर्व देशांमध्ये शिवरायांचा ‘खरा’ इतिहास शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी सावरकरवाद्यांनी एकत्र आलं पाहिजे. कारण सावरकरांच्या मार्गाने चालणे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्गाने चालणे होय!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.