तुम्हाला शिवसेना वाचवायचीय की राष्ट्रवादी मोठी करायचीय? शिंदे गटाचा पवारांना थेट सवाल

140

एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर येऊन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका दीपक केसरकर हे आपल्याला सांगतील, असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिंदे गटाकडून आपले म्हणणे माध्यमांसमोर मांडले. यावेळी केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी तीन वेळा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.

तुमच्या अध्यक्षांना का सांगितलं नाही?

शरद पवार यांच्यावर आमचा विश्वास होता. महाविकास आघाडी ही शरद पवार यांच्या पुढाकाराने तयार झाली होती. पण राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे प्रत्येक मतदारसंघात जाऊन जिथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे, त्याला पराभूत करण्याची भाषा करतात. हे आम्हाला अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे आताचं हे सरकार वाचवण्यापेक्षा जर त्यावेळी तुम्ही तुमच्या प्रदेशाध्यक्षांना समज दिली असती, तर आज ही वेळ आली नसती. तुम्हाला शिवसेना वाचवायची आहे की राष्ट्रवादीला मोठं करायचं आहे, असा सवाल केसरकर यांनी पवारांना केला आहे.

(हेही वाचाः एकनाथ शिंदे पहिल्यांदाच हॉटेलबाहेर, सत्तास्थापनेबाबत केलं मोठं विधान)

आम्हाला आनंद होता पण…

आम्हाला आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला. कुठलीही चांगली मंत्रीपदं शिवसेनेला मिळाली नाहीत, पण तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर खूश होतो. पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठेवण्यात आला नाही, असा आरोपही दीपक केसरकर यांनी यावेळी केला आहे.

शिवसेना संपणार नाही

शिवसेनेमुळे तुम्ही सत्तेत आला आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं नव्हतं. असं असताना सुद्धा ज्या शिवसेनेमुळे तुम्हाला सत्ता मिळाली आहे, ती शिवसेना संपवायचा प्रयत्न तुम्ही केला. पण शिवसेना संपली नाही कारण त्यामागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे, असेही केसरकर यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.