पुत्राने,प्रवक्त्याने डुक्कर, घाण म्हणायचं, दुसरीकडे समेटाची हाक द्यायची! याचा अर्थ काय?

102

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत असून, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्यांकडूनही त्यांच्यावर आगपखड करण्यात येत आहे. हे सगळं असतानाच उद्धव ठाकरे मात्र या आमदारांना भावनिक आवाहन करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर आता एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.

शिंदेंचा ठाकरेंना सवाल

शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांवर आक्रमक भाषेत टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र मंगळवारी सर्व बंडखोर आमदारांना पत्र लिहीत त्यांना भावनिक आवाहन केले आहे. त्यावरुनच एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. ‘एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याची घाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?’, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

(हेही वाचाः बंडाच्या एक वर्ष आधीच उद्धव ठाकरे शिंदेंची हकालपट्टी करणार होते?)

उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी मागवल्या शिंदेंच्या खात्याच्या फायली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.