राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला गुरुवारी बहुमताच्या चाचणीसाठी आवाहन केले आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर बुधवारी संध्याकाळी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत आणि न्या. जेव्ही पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांच्याकडून बाजू मांडली, वकील नीरज कौल यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाजूने तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत.
आमची खरी शिवसेना
शिवसेनेकडून सिंघवी यांनी युक्तिवाद केल्यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे कौल यांनी न्यायालयाला सांगितले आहे. शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांची एकूण संख्या ही 55 इतकी आहे. पण त्यापैकी 39 आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिंदे यांनी स्थापन केलेला गट हीच खरी शिवसेना असल्याचे कौल यांनी न्यायालयात सांगितले आहे.
(हेही वाचाः सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद, एका क्लिकवर)
मंत्रिमंडळाशी चर्चा न करता बहुमत चाचणीच्या घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेच्या वकिलांकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यावर कौल यांनी युक्तिवाद केला आहे. हा आक्षेप चुकीचा असल्याचे कौल यांनी म्हटले आहे. तसेच अपात्रतेचा मुद्दा आणि बहुमत चाचणी यांचा काहीही संबंध नसल्याचे राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community