गुवाहटी येथील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात आता शिवसेनेचे जवळपास सगळेच मंत्री सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला चांगलीच बळकटी मिळाली आहे. रविवारी शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर उदय सामंत यांनी गुरुवारी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेतील शिवसेनेच्या पराभवामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.
शिवसेना संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न
मी आजही शिवसेनेसोबतच आहे. पण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मविआतील मित्र पक्षांच्या वागण्यामुळे वाईट नजर लागली आहे. त्यातून शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्या समर्थनार्थ मी गुवाहटीत आलो आहे. राज्यसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पुरस्कृत आमदार म्हणून तिकीट देण्यात येणार होतं. पण त्यानंतर एका सामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने तिकीट दिलं. त्या शिवसैनिकाला राज्यसभेत कसं जाता येणार नाही याचा संपूर्ण बंदोबस्त काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. अशाच पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.
(हेही वाचाः एकनाथ शिंदे पहिल्यांदाच हॉटेलबाहेर, सत्तास्थापनेबाबत केलं मोठं विधान)
सामंतांचे खाते ठाकरेंकडे
उदय सामंत शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील खात्यांचे फेरवाटप केले आहे. यावेळी उदय सामंत यांच्याकडे असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी ही आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community