‘शिंदे’सेना अखेर मुंबईत दाखल, ताज प्रसिडेंट हॉटेलसाठी रवाना

गेल्या 12 दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर असलेले शिंदे गटातील आमदार हे अखेर शनिवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 50 बंडखोर आमदारांचा हा ताफा आता कफ परेड येथील ताज प्रसिडेंट हॉटेलसाठी रवाना झाला आहे. ताज प्रसिडेंटमध्ये भाजपा आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिंदेसेनेची बैठक होणार आहे.

20 जून रोजी मुंबईतून सुरत, गुवाहटी आणि गोवा असा प्रवास करत अखेर 2 जुलै रोजी शिंदे गटातील सर्व आमदार हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांचा मोठा ताफा रस्त्यांवर तैनात करण्यात आला आहे.

(हेही वाचाः विधानसभा अध्यक्षपदी आम्हीच निवडून येणार, शिवसेनेला विश्वास)

शिंदे गट-भाजपा आमदारांची बैठक

रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे सर्व आमदार सहभागी होणार आहेत. भाजपा आमदार राहुल नार्वेकर तर शिवसेनेकडून आमदार राजन साळवी यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शिंदे गट आणि भाजप आमदारांची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ताज प्रसिडेंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

आम्हाला शिवसेनेचा व्हिप लागू नाही

राजन साळवी यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिंदे गटालाही तो व्हिप लागू होत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. हा दावा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना पक्ष प्रतोद सुनिल प्रभू यांनी काढलेला व्हिप लागू होत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः शिवसेनेचा व्हिप लागू होतो का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here