अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह भाजपा-शिवसेना युती सरकारला पाठिंबा दर्शविल्यामुळे शरद पवार यांची पुरती कोंडी झाली आहे. परंतु, शरद पवारांच्या पक्षात बंडखोरी होण्याची ही पहिली वेळ नव्हे, १९८० साली ते परदेश दौऱ्यावर गेले असता, ५८ पैकी तब्बल ५२ आमदारांनी त्यांची साथ सोडली होती.
आणीबाणीनंतर काँग्रेसला दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला होता. जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधानपदी निवडून आले. ते भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले होते. आणीबाणीचा परिणाम काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात झाला होता. १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसची स्थापना झाली.
१९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुलोद सरकार स्थापन झाले. पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९८० साली इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झाले आणि त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. यामध्ये शरद पवारांच्या सरकारचाही समावेश होता.
जून १९८० मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या. समाजवादी काँग्रेसकडे स्वतःच्या ४७ आणि अपक्ष मिळून ५८ आमदारांचा पाठिंबा राहिला. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शरद पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.
मात्र, १९८० साली ते १५ दिवसांसाठी लंडन दौऱ्यावर गेले असता समाजवादी काँग्रेसच्या ५८ पैकी ५२ आमदारांनी त्यांची साथ सोडली. ते लंडन दौऱ्यावरून परत आले, तेव्हा त्यांच्याकडे फक्त सहा आमदार उरले होते. मात्र, १९८५ साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा सहाचे साठ आमदार करुन दाखवले. त्यातील ५४ जण हे पहिल्यांदाच आमदार झाले होते.
Join Our WhatsApp Community