बंडखोर आमदारांविरोधात राज्यातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या आदारांवर सडकून टीका केली आहे. यावेळी संजय राऊत यांची जीभ घसरली. त्यामुळे आता बंडखोर आमदारांकडूनही राऊतांवर प्रतिहल्ला केला आहे. संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये, शिवसेनेचे मित्र राऊतांनीच संपवले, असा आरोपही शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.
राऊतांनी शिवसेनेसाठी काय केलं?
कोकणात शिवसेनेचा झेंडा फडकवायचा हा बाळासाहेब ठाकरे यांचा निर्धार होता. त्यानुसार राणेंच्या दहशतीला आव्हान देत मी कोकणातून निवडणूक जिंकलो. पण संजय राऊतांनी आजवर शिवसेनेसाठी काय केलं?, असा थेट सवालही केसरकर यांनी राऊतांना केला आहे.
(हेही वाचाः बंडखोरीमुळे व्यथित झालेले आदित्य झाले आक्रमक)
हे शिवसेनेला चालतं का?
बंडखोर आमदारांचे 20-25 बाप आहेत. एका बापाचे असाल तर निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे. आता अशापद्धतीने कोणावर टीका करणं हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. हा अपमान शिवसेनेला चालतो का, असा सवालही यावेळी दीपक केसरकर यांनी केला आहे.
(हेही वाचाः आनंद दिघे माझ्यामुळे ‘धर्मवीर’ झाले, राऊतांचे खळबळजनक विधान)
कुठे बाळासाहेब, कुठे हे?
तसेच संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर खूपच हीन अशी टीका केली. हा आमदार पान टपरीवर जाईल, तो भाजी विकेल, हा रिक्षा चालवेल, तो ढुंगणाला पाय लावून पळाला, अशी विधानं संजय राऊत यांनी केली आहेत. त्यांच्या या विधानांमुळे सर्व आमदारांच्या डोळ्यात पाणी आले. पाठीवरुन प्रेमाने हात फिरवणारे बाळासाहेब कुठे आणि कुठे हे असं सांगत केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(हेही वाचाः आता शिंदे गटाचीही न्यायालयात धाव)
काय म्हणाले होते राऊत
शिवसेनेच्या दहिसर येथील मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. जे 40 आमदार गेले आहेत ते एका बापाचे असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. या 40 आमदारांचे मृतदेह येथे येतील, त्यांचे मृतदेह थेट शवागृहात पाठवू. गुवाहटीतील कामाख्या देवी मंदिरात रेड्याचे बळी देतात, आम्ही 40 रेडे पाठवले आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती.
Join Our WhatsApp Community