एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिंदे गटानेही जोरदार तयारी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
काय झाली चर्चा?
या चर्चेदरम्यान शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली असून राज्यातील राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांची संख्या वाढत असून त्यांना अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन झालेल्या चर्चेची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा रंगली आहे.
(हेही वाचाः बंडखोरीमुळे व्यथित झालेले आदित्य झाले आक्रमक)
शिंदे गटाची न्यायालयात याचिका
शिंदे गटातील 16 आमदारांनी घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. पण याविरोधात आता शिंदे गटाकडूनही याचिका दाखल करण्यात आली असून, या याचिकेवर सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदाबाबत ही याचिका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही लढाई आता कायद्याच्या चौकटीत लढली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः आता शिंदे गटाचीही न्यायालयात धाव)
Join Our WhatsApp Community