एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांवर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देखील शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांना करण्यात आली आहे. त्यावरुनच आता शिवसेनेच्या भायखळा येथील आमदार यामिनी जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कॅन्सर झाला तरी आधार दिला नाही
माझे पती यशवंत जाधव हे 43 वर्ष शिवसेनेत आहेत. त्यांच्यापुढे अनेक संकटं आली पण आजवर त्यांनी पक्षाच्या विरोधात कधीही भूमिका घेतली नाही. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं वादळ आलं. यामुळे माझे संपूर्ण कुटुंब हादरले. माझ्या या आजाराबाबतची माहिती यशवंत जाधव यांनी पक्षाला दिली होती. हे समजल्यानंतर शिवसेनेतील काही नेते एक महिला आमदार आजारी आहेत म्हणून विचारपूस करायला येतील, अशी माझी अपेक्षा होती. शिवसेनेतील नेत्यांकडून आम्हाला कोणीही आधार दिला नाही. किशोरी पेडणेकर यांनी केवळ माझ्या घरी येऊन मला धीर दिला. पण इतर कुणीही हे केलं नाही, अशा शब्दांत यामिनी जाधव यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे.
(हेही वाचाः ‘जे माझे नव्हतेच त्यांच्यासाठी मला वाईट का वाटावं?’, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांबाबत संताप)
…मग त्यांनी विचारपूस केली असती का?
मी स्वतः नगरसेविका असल्यापासून अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झालेला मी पाहिलेला आहे आणि त्यावेळी त्यांना होणारा त्रास देखील मी पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नींप्रमाणे माझी मरणासन्न अवस्था झाल्यावर माझ्या पक्षातील नेते मला भेटायला आले असते का, असा भावनिक सवालही जाधव यांनी शिवसेनेतील नेत्यांना केला आहे.
कारण शोधायची गरज
या सर्व परिस्थितीनंतर मी आज या निर्णयाला पोहोचले आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं, मनाला आजही वेदना होत आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की शिवसेना सोडून जाधव दाम्पत्याने इतर कोणत्याही पक्षात आम्ही गेलेलो नाही. आम्ही शिवसेनेविरोधात कधीही जाणार नाही पण माझ्या या भूमिकेमागे काहीतरी कारण आहे ते शिवसेनेतील नेत्यांनी शोधायची गरज असल्याचे आवाहन यामिनी जाधव यांनी केले आहे.
(हेही वाचाः ‘फक्त वीट येऊन चालणार नाही, वीट हाणावी लागेल’, मुख्यमंत्री संतापले)
Join Our WhatsApp Community