बहुचर्चित मनोरा आमदार निवास पाडून तब्बल चार वर्षे उलटली, तरी पुनर्बांधणी होत नसल्याने राजकीय कार्यकर्ते आणि मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र, आता ‘मनोरा’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात भूमिपूजन होणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
टाटा, एल अँड टी आणि शापूरजी पालनजी या तीन दिग्गज कंपन्यांनी मनोरा आमदार पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली होती. त्यापैकी एल अँड टी कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. वास्तुविशारद व सल्लागार म्हणून सुप्रसिद्ध वास्तू रचनाकार शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ च्या आराखड्यानुसार, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासासाठी सुमारे ८५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र गेल्या चार वर्षात त्यात बरीच वाढ झाली असून, नव्या अंदाजपत्रकानुसार हा खर्च १ हजार २६९ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
(हेही वाचा – Manipur Violence : सीबीआयकडून १० जणांना अटक)
१९९४ मध्ये मनोरा आमदार निवास उभारण्यात आले. मात्र, अवघ्या २५ वर्षांत ही इमारत जीर्ण झाली. पावसाचे पाणी पाझरणे, प्लॅस्टर पडणे, यासह अनेक अडचणी येऊ लागल्या आणि इमारत धोकादायक ठरविली गेली. त्यामुळे ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ मध्ये ती जमीनदोस्त करण्यात आली. राज्य सरकारने या ठिकाणी नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपवली. मात्र, चार वर्षे उलटली, तरी त्यांना एकही वीट रचता आलेली नाही.
आमदारांची चांदी
मनोरा आमदार निवासात १५० आमदारांसाठी खोल्या होत्या. त्यातील बहुतांश आमदारांना आकाशवाणी व विस्तारित आमदार निवासात सामावून घेण्यात आले. काहींना शासकीय विश्रामगृहांमध्ये खोल्या देण्यात आल्या. उर्वरित आमदारांना निवास खर्चापोटी दरमहा १ लाख रुपये दिले जात आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community