Supriya Sule : अजित पवारांशी वैचारिक मतभेद कायम, पण…सुप्रिया सुळे ‘त्या’ भेटीवर काय म्हणाल्या?

124

आम्ही वैचारिक मतभेद आणि नात्यांमध्ये असलेला ओलावा यात कधीही फरक करत नाही. एन.डी. पाटील यांच्या पत्नी या शरद पवारांच्या बहिण आहेत. मात्र तरीही एन.डी. पाटील आणि पवार यांच्यात वैचारिक मतभेद होते. तथापि आमच्या नात्यांमधला ओलावा कधीही कमी झाला नाही. त्याच पद्धतीने अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील नात्यांमधील ओलावा हा कुठेही कमी झालेला नाही. मात्र पक्षातील वैचारिक मतभेदांवर आम्ही नेहमीच एकमेकांच्या विरोधात असणार, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर दिले.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी भेट झाली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असा खुलासा पवार काका- पुतण्याने   केला असला तरीही दोघांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाप्रमाणे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी वरील खुलासा केला.

(हेही वाचा Sharad Pawar : अखेर शरद पवारांनी अजित पवारांसोबतच्या भेटीमागील केला खुलासा; म्हणाले…)

आमचे विचार आणि अजितदादांचे विचार यात फरक आहे. मात्र त्यात कुटुंबातील नात्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. दादा आणि  शरद पवार भेटीमुळे महाविकास आघाडी कुठलाही संभ्रम नाही, असेही सुळे म्हणाल्या. नवाब मलिक हे नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहेत. मात्र ते तिकडे जातील असे वाटत नाही. कारण नवाब मलिकांवर आरोप कोणी केले, मलिकांना जो त्रास झाला तो कुणामुळे झाला हे त्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. नवाब मलिक हे त्याच व्यक्तींच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली. ज्या पद्धतीने त्यांच्या दोन्ही मुली या लढल्या आहेत ते पाहता नवाब मलिक वेगळा निर्णय घेतील असे वाटत नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.