मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सरासरी ३००च्या आसपास आल्याने निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये दुकानांच्या वेळा तीन तासांनी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांना रात्री ११ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुंबईतील दुकानदारांना बऱ्याच संघर्षानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील २५ जिल्हयांमधील पॉझिटिव्हीटी रेट कमी
राज्यातील कोरोनाच्या निर्बंधाबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत चर्चा केली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील २५ जिल्हयांमधील पॉझिटिव्हीटी रेट आणि रुग्णवाढीचा दर कमी असल्याने तेथील निर्बंध शिथिल करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत अधिकृत निर्णय होईल. टोपे यांनी जाहीर केलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये मुंबईचाही समावेश आहे.
(हेही वाचा : कोरोना निर्बंधातून मुंबई सुटणार, पण लोकलचे काय?)
हॉटेल्स रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहतील!
मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या ३००ते ५००च्या आत सीमित असून तसेच रुग्णांचा मृत्यू दरही कमी झालेला आहे. त्यामुळे २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल झाल्यास मुंबईत सध्या जे दुकानदारांना ४ वाजेपर्यंत दुकाने व आस्थापने खुली ठेवण्यास परवानगी दिली जाते, ती आता संध्याकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी दिली जावू शकते. मात्र, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर हे संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरु राहतील. तर हॉटेल्स रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवली जातील. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर झाला असून राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबईत अशाप्रकारे नियम जारी केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुकाने, आस्थापने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील!
मागील काही दिवसांपासून दुकाने अनधिकृतपणे चार वाजल्यानंतरही सुरु आहेत. याबाबत मनसेने व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर पोलिस सहआयुक्तांनी प्रत्येक परिमंडळ उपायुक्तांना याबाबत निर्देश देत ज्या भागांमध्ये दुकाने ४ नंतर सुरु राहिल्यास तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल,असा इशारा दिला होता. त्यानंतरही काही ठिकाणी पोलिसांची नजर चुकवून दुकाने सुरु जात होती. यानंतर दुकानदार, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली जावी, अशी विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर संध्याकाळ ७ वाजेपर्यंत दुकाने व इतर गाळे सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मॉल्स व शॉपिंग सेंटरमध्ये कोविड प्रतिबंधक नियमांचे योग्यप्रकारे पालन होत नसल्याने त्यांना चार वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी असेल, अशीही माहिती मिळत आहे.