पंचनामे पूर्ण होताच कोकणाला मदत! मुख्यमंत्र्यांची घोषणा 

मी पायी दौरा करत आहे, हेलिकॉप्टरने फिरत नाही. त्यामुळे ४ तासांचाच दौरा केला, मात्र त्यातही महत्वाच्या भागांना भेटी दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर टोला हाणला. 

105

राज्यात तौक्ते वादळाने थैमान घातले. यात कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणाला कोरोना आणि वादळ या दुहेरी संकटाना सामोरे जावे लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल येताच कोणत्या स्वरूपाची मदत जाहीर करायची याचा निर्णय घेऊन मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ मे रोजी रत्नागिरी येथे दिले.

इथे राजकारण करायला आलो नाही! 

शुक्रवार, २१ मे पासून मुख्यमंत्री ठाकरे हे २ दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरीचा दौरा पूर्ण केला असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. मी इथे कोकणच्या मदतीसाठी आलो आहे. फोटो सेशन करायला आलो नाही. तसेच मी पायी दौरा करत आहे, हेलिकॉप्टरने फिरत नाही. त्यामुळे ४ तासांचाच दौरा केला, मात्र त्यातही महत्वाच्या भागांना भेटी दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर टोला हाणला.

(हेही वाचा : ठाकरे सरकारला नको आहे केंद्राची मदत?)

पंतप्रधानही राज्याला मदत करतील!

पंचनामे येत्या २ दिवसांत पूर्ण होतील, त्यानंतर कोकणाला कशा स्वरूपाची मदत करायची, याचा निर्णय घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रालाही याकरता मदत करतील, असे सांगत मी इथे राजकारण करायला आलो नाही असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मी राजकारण करायला, विरोधकांना उत्तर द्यायला नव्हे तर कोकणाला मदत करायला आलो आहे. नुकसानग्रस्तांना सरकार नाराज करणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

जिल्हयातील 5 तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले!

जिल्हयात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीतआढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती. तौक्ते चक्रीवादळाने जिल्हयातील 5 तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हयांचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली. जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

मोठ्या प्रमाणावर नुकसान

जिल्हयात झालेल्या नुकसनीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्हयात 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या 11 आहे. जिल्हयात 17 घरे पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित घरांची संख्या 6766 आहे. यात सर्वाधित दापोलीत 2235 आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1084 तर राजपूरातील 891 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठयांची जिल्हयातील 370 इतकी आहे. वादळात वाऱ्यामुळे 1042 झाले पडली. यात सर्वाधित 792 झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या 250 इतकी आहे. चक्रीवादळात 59 दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. या सर्व शाळा राजापूर आहेत.

2500 हेक्टर इतके नुकसान झाले!

चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचे या साधारण 2500 हेक्टर इतके नुकसान झाले. यातील 3430 शेतकऱ्यांच्या 810.30 हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.

1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद होता

चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे. बाधित उपकेंद्राची संख्या 55 व फिडरची संख्या 206 आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे 485 खांब बाधित झाले असून यापैकी 125 पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या 1233 इतकी आहे. यातील 133 खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसाय

जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी 3 बोटी पूर्णत: तर 65 बोटींचे अशंत: नुकसान झाले. 71 जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान 90 लाख रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे 1कोटी 98 लाख 84 हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

‘निसर्ग’ वादळाचे पंचनामे केले, मदत पोहचली नाही! – देवेंद्र फडणवीस 

देवेंद्र फडणवीस वादळाने झालेल्या नुकसानीची मदत कोकणातील मासेमारांपर्यंत पोहचलीच नाही. आधीच्याच निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी येथील मासेमारांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले, त्यानंतर मात्र पुन्हा परत कुणी फिरकलेच नाही, असे मासेमार संगत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. रायगड, रत्नागिरीचा दौरा आटोपून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचले. शुक्रवारी, २१ मे रोजी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांशी आणि अन्य अधिकार्‍यांशी चर्चा केली. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, प्रसाद लाड यावेळी उपस्थित होते. सिंधुदुर्गमध्ये सुमारे 800 ते 1000 घरांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात वीज सुविधा, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे नुकसान झाले आहे. सुमारे 1 लाख घरांमध्ये वीज नाही आणि ती सुरू होण्यास 3-4 दिवस लागतील, शेतीचे 3 ते 4 हजार हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. वीज पायाभूत सुविधा अंडरग्राऊंड करण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने योजना तयार केली आहे. या योजनेचा लाभ घेत कोकणासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरवून ही योजना पूर्णत्त्वास नेली पाहिजे. असे केल्यास वारंवार येणार्‍या वादळांमुळे भविष्यात वीजेच्या बाबतीत असे नुकसान होणार नाही. नियमित कर्जमाफीचा कोकणातील शेतकर्‍याला फायदा होत नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांनी कर्जमाफीची केलेली मागणी अतिशय रास्त आहे. त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

New Project 33

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.