प्रकृतीच्या तक्रारी असलेल्या देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मुंबई सत्र न्यायालयानं दिली आहे. देशमुख सध्या खंडणीखोरीच्या आरोपांखाली तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांच्यावर एन्जिओग्राफीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आपल्याला खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी दिली जावी, अशी याचिका देशमुख यांनी केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयानं आज, सोमवारी त्यांना खासगी रुग्णालयात उपाचाराची परवानगी दिली. त्यानुसार आता अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
(हेही वाचा – राणा म्हणताय, “…म्हणून श्रीरामांनीच उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला”)
यापूर्वीही अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, ईडीने त्यास विरोध केला होता. देशमुख यांना हवे असलेले उपचार जे जे रुग्णालयात मिळू शकतात. जे जे रुग्णालयातील डॉक्टर सक्षम असून या रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधाही आहेत, असा युक्तिवाद ईडीने केला होता.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या जाळ्यात अडकले होते. अनेक छाप्यानंतर ईडीनं देशमुख यांना अटक केली होती. गेल्या 11 महिन्यापासून ते तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयानं ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात अद्याप त्यांना जामीन मिळाला नसल्यानं त्यांची सुटका होऊ शकलेली नाही. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे देशमुख यांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ईडीनं विरोध दर्शवला आहे. त्या विरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर पुढील सुनावणी होण्याआधीच देशमुख यांना दुसरा दिलासा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community