बकरी ईदनिमित्ताने तीन दिवस केवळ ३०० मोठ्या जनावरांची कुर्बानी देवनार कत्तलखान्यात करण्यास मुंबई महापालिकेने अनुमती दिली आहे. त्यात सवलत देऊन ती संख्या ७०० करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ती याचिका फेटाळून लावत ‘मानवी आरोग्यापेक्षा धर्म मोठा नाही’, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सुनावले.
हे सर्वसामान्यांच्या हिताचे ठरणार नाही!
मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली, तेव्हा याचिकाकर्त्याला सुनावले. लोकांच्या आरोग्यापेक्षा धर्म मोठा नाही, हे लक्षात ठेवावे. अशा प्रकारे यावर सवलत देणे सर्वसामान्यांच्या हिताचे ठरणार नाही. अन्यथा प्रशासन कुणावरही नियंत्रण ठेवू शकणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
काय म्हटले याचिकाकर्त्याने?
बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई महापालिकेने नियमावली सादर केली आहे. त्यामध्ये महापालिकेने म्हटले आहे कि, २१ जुलै ते २३ जुलै या तीन दिवसांमध्ये केवळ सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच देवनार कत्तलखाना सुरु राहील, तसेच या दिवसांत दररोज केवळ ३०० मोठ्या जनावरांची कत्तल करण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये ७०० मोठ्या जनावरांना दर दिवशी कत्तलीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सध्या नागरिक ऑनलाईन जनावरांची खरेदी करत आहेत, ही संख्या पाहता दिवसाला किमान १००० जनावरांची कत्तल करण्याची परवानगी मिळणे अपेक्षित आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community