अखेर मंत्री शिंगणेंनी सरकारचे तोंड फोडले ! प्रविण दरेकरांची टीका

रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काही पुरवठा सरकारला झाला, त्याचा लेखाजोखा सरकार जनतेला देणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

147

रेमडेसिवीरचा ब्रूक फार्मा कंपनीकडील साठा हा राज्य सरकारकडेच येणार आहे, हे सांगून आम्ही दमलो. शेवटी सरकारचेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीच ‘असा कोणताही साठा महाराष्ट्रात नाही, दमणच्या कंपनीकडून साठा सरकारलाच मिळणार होता’, असे स्पष्टपणे सांगून महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. रेमडेसिवीरचे टेंडर फिस्कटले, कमिशनही बुडाले म्हणून ज्यांनी कुभांड रचले, त्यांचे त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांनी तोंड फोडले, अशी जळजळीत टीका विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी केली.

रेमडेसिवीरचा अनधिकृत साठा महाराष्ट्रात आहे, देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी पोलिसांवर दबाव आणला, साठ्याची चौकशी करा, अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडी सरकारमधील बाळासाहेब थोरात, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील आदी नेते सातत्याने करीत होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि नाना पटोले यांनी देखील भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी खुलासा केला. या संदर्भात दरेकर माध्यमांशी संवाद साधत होते.

आघाडीतील नेते आता महाराष्ट्राची माफी मागणार का?

आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, रेमडेसिवीरचा साठा सरकारकडेच येणार आहे, ब्रूक फार्मा कंपनीने कोणताही साठा महाराष्ट्रात नेलेला नाही, ते महाराष्ट्राला मदत करीत आहेत, दमणला गेल्यापासून आम्ही मंत्री राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, सचिव या सर्वांशी संपर्कात होतो, राजेंद्र शिंगणे हे देखील परवान्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होते. पण ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत साठा महाराष्ट्राला मिळणार आहे, हे लक्षात आले त्यावेळी आघाडीच्या पक्षातील काही नेत्यांचा अहंकार जागा झाला. त्याबरोबरच रेमडेसिवीरसाठी टेंडर मागवले गेले, पण कमिशनसाठी फायनल झाले नाही, म्हणून हे कुंभाड रचले गेले. मी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना धन्यवाद देईन की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य परिस्थिती आणली. त्यांनी हे स्पष्ट केले की, महाराष्ट्रात असा कोणताही साठा नाही, दमणच्या कंपनीकडून सरकारलाच साठा मिळणार होता. नवाब मलिक, दिलीप वळसे -पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि प्रियंका गांधी महाराष्ट्राची माफी मागणार का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

महामारीच्या काळात रेमडेसिवीर वाटपाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवा!

नवाब मलिक यांनी अमळनेरच्या घटनेबाबत केलेल्या आरोपाचा खुलासा करताना दरेकर म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर आरोप आहेत ते त्या कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर आहेत, निर्यातबंदीपूर्वी त्यांचा व्यवहार झालेला होता. तरी देखील कुणी काही चुकीचे केले असेल तर त्याला पाठीशी घालण्याचे काही कारण नाही. महामारीच्या काळात जनतेचे जीवित महत्त्वाचे आहे, त्यामुळे कायद्याचा बडगा उगारण्यापेक्षा मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. या प्रकरणात नेमके काय झाले माहीत नाही, पण तेथील जनता किंवा मृत्यूच्या छायेखाली असलेला रुग्ण इंजेक्शन पुरवणाऱ्यांना दुवाच देत असतील. त्यामुळे ज्या सरकारला उपाययोजना करता आल्या नाहीत ते सरकार कारवाईची भाषा करीत आहे, हे दुर्दैवी आहे. सरकार पुरेशी इंजेक्शन उपलब्ध करून देत नाही. मग जो काही पुरवठा सरकारला झाला त्यापैकी सरकारने किती रुग्णालयांना, मेडिकल दुकानांना, महानगरपालिकांना, किती प्रमाणात इंजेक्शन दिली, त्यापैकी आता किती शिल्लक आहेत, याचा लेखाजोखा सरकार जनतेला देणार का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा : राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये… पटोलेंचा सल्ला!)

रोहित पवारांना रेमडेसिवीरचा साठा कुठून मिळाला?

रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात इंजेक्शनचे वाटप केले होते. याचा संदर्भ घेऊन दरेकर म्हणाले की, दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना चार बोटे आपल्याकडे असतात, याचा विसर नवाब मलिक याना पडलेला दिसतो. राष्ट्रवादी वेल्फेअर बोर्डाच्या वतीने युवा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत बाबर व माजी नगरसेवक दीपक राज यांच्याकडे इंजेक्शनचा साठा देण्यात आला. राष्ट्रवादी वेल्फेअर बोर्डाकडे किंवा रोहित पवार यांच्याकडे इंजेक्शनचा साठा कुठून आला, याची सरकारने चौकशी केली का, त्यांना साधी नोटीस तरी पाठवली का ? पण आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट ही या सरकारची प्रवृत्ती आहे. दरेकर यांनी बोगस इंजेक्शन रॅकेटचा उल्लेख करताना सांगितले की, दस्तुरखुद्द बारामतीच्या काठेवाडी येथे रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटेमॉलपासून बनवलेल्या 35,000 बनावट इंजेक्शनचा पर्दाफाश झाला. त्यामधील एक आरोपी दिलीप गायकवाड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याचीही चौकशी झाली नाही. आपल्या अपयशाचा फोकस दुसरीकडे नेण्यासाठी चार-पाच दिवस रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा वाद घातला गेला. नवाब मलिक यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन इंजेक्शनचा लेखाजोखा जनतेपुढे ठेवावा आणि कार्यकर्त्यांना किती इंजेक्शन दिली, याचीही माहिती द्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी कुणी खरेदी केल्या?

नवाब मलिक यांनी आमदार प्रसाद लाड आणि अतुल भातखळकर यांच्यावर देखील आरोप केले होते. त्याचा धागा पकडून दरेकर यांनी मलिक यांच्यावर आज गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी कुणी खरेदी केल्या याची सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. परंतु, कोविडसारखी नाजूक परिस्थिती असल्यामुळे आम्ही तो विषय बाहेर काढलेला नाही. परंतु, दरेकर यांनी असा इशारा दिला की, ही नाजूक परिस्थिती सावरल्यानंतर एकेक प्रकरण आम्ही महाराष्ट्रासमोर आणणार आहोत. आपल्या जावयाला झालेली अटक आणि कारवाईमुळे एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन मलिक यांनी वक्तव्ये केलेली आहेत. राजकीय युद्ध योग्य वेळी, योग्य ठिकाणी खेळता येईल, आता ती परिस्थिती नाही, अशी समजही दरेकर यांनी मलिक यांना दिली. जनतेसमोर यांच्या राजकीय कुरघोड्या उघड झालेल्या आहेत, यांची पुरती नाचक्की झालेली आहे, त्यामधून सावरण्याचा प्रयत्न नवाब मलिक करताना दिसत आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

महाविकास आघाडीकडून केंद्रावर नाहक आरोप

केंद्र सरकार महाराष्ट्राची अडवणूक करते, अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडी सरकारकडून होत असतात. याबाबत दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांसमोर परिस्थिती मांडली, काही कंपन्यांशी बोलून महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शनचा वाटा राखीव ठेवावा, अशी भूमिका मांडली, दुसरीकडे काल-परवा 1,500 मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्याची घोषणा पियुष गोयल यांनी केली, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. म्हणजे केंद्र सरकार सर्वतोपरी मदत महाराष्ट्राला करीत आहे. राज्य सरकारने त्याचे श्रेय केंद्राला देण्याचे सोडा, किमान राजकारणापोटी केंद्राला दूषणे देण्याचे काम तरी करू नये, एव्हढीच आमची विनंती आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी राज्य सरकार 32 टॅंकर पाठवणार होते, पण 10 टँकर सुद्धा सरकार पाठवू शकले नाही. अशा प्रकारचे अनेक अपयश आम्ही जनतेसमोर मांडतो, त्याचे या सरकारला दुःख आहे, अशीही टीका दरेकर यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.