भगतसिंह कोश्यारींना तत्काळ पदावरुन दूर करा; उदयनराजेंनी केली पंतप्रधानांकडे तक्रार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणा-यांवर ठोस कारवाई करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. तसेच, उदयनराजे यांनी भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीदेखील पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा, अशी मागणीदेखील उदयनराजे भोसले यांनी पत्राद्वारे  केली आहे. तसेच, महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असा खेद त्यांनी व्यक्त केला आहे.

पत्रात काय म्हटलंय ?

काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे उदयनराजे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

20 नोव्हेंबर 2022 रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे उदयनराजे म्हणाले आहेत.

( हेही वाचा: अहो संजय राऊत, हिंदुत्वाशी तडजोड तर केव्हाच केलीय )

राज्यपाल पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केलाच आहे. पण यापूर्वीही त्यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केले होते. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याच हा प्रयत्न आहे, अशी तक्रारही उदयनराजे यांनी केली आहे. महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत, असे मत त्यांनी मांडले. आपण यावर योग्य कारवाई कराल याची खात्री आहे, असे उदयनराजे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here