मुंबई : वार्षिक परीक्षेत दमदार कामगिरी व्हावी म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांची उजळणी घेत असतात, त्याप्रमाणे भाजपाच्या खासदारांची सध्या उजळणी सुरू आहे. मात्र, या उजळणीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रिपोर्टकार्ड हातात घेऊन बसल्यामुळे अनेक खासदारांना घाम फुटला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपाच्या विभागवार बैठका शुक्रवारी, ८ सप्टेंबरला मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी ९:३० ते रात्री ९:३० पर्यंत चालणाऱ्या या मॅरेथॉन बैठकांना पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, मतदारसंघांचे प्रभारी, लोकसभा प्रदेश पदाधिकारी उपस्थित आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या तयारीबाबत यावेळी चर्चा होत असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) असलेल्या लोकसभा मतदारसंघांमधील तयारीचादेखील आढावा घेतला जात आहे.
विशेष म्हणजे प्रदेश भाजपाने आपल्या २३ खासदारांचे रिपोर्टकार्ड तयार केले असून, त्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे एकेका खासदाराशी बंद दाराआड चर्चा करीत आहेत. त्यानंतर संबंधित लोकसभा मतदारसंघातील आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, मतदारसंघांचे प्रभारी यांच्यासोबत बैठक घेतली जात आहे. त्यात मतदारसंघातील नागरिकांचा सध्याचा कल, विद्यमान खासदाराबद्दलच्या भावना, त्याची कामगिरी याविषयी उहापोह केला जात आहे.
कामगिरीत सुधारणा करा!
– भाजपाच्या विभागवार बैठकीमध्ये राज्यातील खासदारांचे चार वर्षांचे रिपोर्टकार्ड दिले जात आहे. काही खासदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे त्यातून समोर आले आहे. त्यामुळे संबंधित खासदारांना कामात सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
– आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत बसवायचे आहे. त्यासाठी त्यागाची भावना ठेवा, जनसंपर्क वाढवा, लोकांमध्ये जाऊन मोदींच्या योजना घरोघरी पोचवा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
– सोशल मीडियावर सक्रिय नसलेल्या खासदारांना यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कानपिचक्या दिल्या आहेत. अलीकडच्या काळात सोशल मीडिया हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. अशावेळी आपण मागे राहिलो तर कालगत होऊ, अशा शब्दांत त्यांनी अनेकांची कानउघाडणी केल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community