शिवसेना महिला आघाडीतील बिघाडी : त्यामुळे ‘या’ घेणार महिला आघाडीच सूत्रे हाती?

138

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना तसेच आमदार,खासदारांना भेटत नसल्याचा आरोप करत काही लोकप्रतिनिधींनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला असला तरी प्रत्यक्षात या पक्षातील उपनेत्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेल्या उपनेत्याने केला आहे. शिवसेनेतील दोन उपनेत्या इतर सहकारी पदाधिकाऱ्यांनी रश्मी ठाकरे आणि पक्षप्रमुख यांच्या जवळ जावू नये यासाठीच अधिक प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे शिवसेनेत महिला आघाडीतील बिघाडी आता समोर आली असून रश्मी ठाकरे या आता स्वत: महिला आघाडीची सुत्रे हाती घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : भांडुप पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाच्या बांधकामात अशीही श्रेयाची लढाई)

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उपनेतेपदी वर्णी लागलेल्या दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आशा मामिडी यांनी इतर महिला उपनेत्यांच्या जाचाला कंटाळून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेच्या उपनेत्या मिना कांबळी दक्षिण मुंबईतील असून दक्षिण मुंबईतील कामाठी पुरा परिसरात प्रतिनिधीत्व करणाऱ्या आशा मामिडी यांना पक्षाने उपनेत्या बनवल्याने कांबळी यांच्यासमोर एक आव्हान निर्माण केले होते. कांबळी, विशाखा राऊत या निलम गोऱ्हे यांच्या गटाच्या असून मामिडी यांची उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर कांबळी आण राऊत यांनी त्यांना प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मामिडी यांनी पक्ष सोडल्यानंतर एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना उपनेत्या कांबळी आणि राऊत या पक्षवाढीतील प्रमुख अडसर असल्याचे सांगत त्यांना आधी पक्षाने बाजुला करावे असे म्हटले आहे. याबरोबरच त्यांना गिफ्ट आणि कामे दिल्या तरच त्या चांगल्या म्हणतात असे सांगत मामिडी यांनी या उपनेत्या पक्षासाठी मारक असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे पक्षवाढीसाठी प्रयत्नाचे कौतूक केले होते. त्यामुळे या दोघींमुळेच आपण पक्ष सोडत असल्याचे त्या मुलाखतीत म्हटले होते.

मामिडी या पक्ष सोडून गेल्यानंतर खुद्द उध्दव ठाकरे यांनीही त्यांचे नाव तुमच्या आपापसातील स्पर्धेमुळे चांगली माणसे सोडून जात असल्याचे म्हणत महिला पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते. विशेष म्हणजे या मेळाव्याला खुद्द रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

परंतु मामिडी यांनी पक्ष सोडल्यानंतर महिला आघाडीतील गटबाजी लक्षात घेता या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी रश्मी ठाकरे या आता महिला आघाडीची जबाबदारी आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. गटबाजी थांबवून पक्षातील कोणीही महिला पदाधिकारी नाराज होऊन बाहेर पडू नये म्हणून रश्मी ठाकरे यांना या महिला आघाडीची मोट बांधून ठेवण्यासाठी मैदानात उतरावे लागत आहे. यापूर्वी रश्मी ठाकरे या महिला आघाडीसोबत असल्या तरी काही महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होत असत. परंतु आता पक्ष अडचणीत असल्याने त्यांनाही मैदानात उतरून महिला आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा अशाप्रकारची विनंती अनेकांनी केलेली आहे. त्यानुसार त्यांनी आता मनाची तयारी केली असल्याने येत्या काही दिवसांमध्ये महिलांचे मेळावे आयोजित करून त्यात रश्मी ठाकरे या सहभागी झालेल्या दिसतील असे सुत्रांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.