शेतक-यांसाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार ?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वेगाने होईल यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे 50 लाख डोसेस आरोग्य यंत्रणेने दिलेले आहेत. जिल्ह्यात लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. तसेच, शेतक-यांसाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी अहमदनगर येथे केले.

आरोग्य यंत्रणा सज्ज

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नूतन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरिक आदींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या तिस-या लाटेचे संकट आपल्या समोर आहे. दररोज रूग्ण संख्या वाढत आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. अशावेळी जनतेनं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे, अशा छोट्या छोट्या गोष्टींच तंतोतंत पालन करत, स्वत:च्या बरोबर इतरांचं आरोग्य जपलं पाहिजे. असे आवाहन मुश्रीफ यांनी यावेळी केले. कोरोना उपाययोजना बाबत बोलतांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपण प्रभावी उपाय योजना राबवित आहोत.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 39 लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 27 पीएसए प्लॅंट कार्यान्वित झाले आहेत. तर 16 एलएमओ प्लॅंट सुरू झाले आहेत 228 मेट्रीक्स टन ऑक्सिजनची निर्मिती यातून होणार आहे. दुस-या लाटेत सर्वोच्च दैनंदिन रुग्णसंख्येसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सीजनपेक्षा तिप्पट व्यवस्था आपण उभी करीत आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने 107 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून 14 कोटींचे कामे मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. फ्रंट लाईन वर्कर व ज्येष्ठ नागरीकांना बुस्टर डोस देण्यासही सुरूवात झालेली आहे.

राज्याच्या विकासावर भर

कृषी क्षेत्रात केलेल्या कामाबाबत बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच स्मार्ट प्रकल्पात जिल्ह्यातील 64 प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. यात राज्यात अहमदनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत 1930 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 696 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यात 17 हजार शेततळे बांधण्यात आली. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यासाठी 53 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. कृषी सिंचन योजने अंतर्गत आतापर्यंत 66 हजाराहून अधिक शेतक-यांना ठिबक आणि तुषार सिंचनाचा लाभ आपण दिला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यात आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2022-23 साठी 540 कोटी रुपयांचा नियतव्यव मंजूर करण्यात आला आहे. नूतन व सुसज्ज अशा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे. या भव्य व दिव्य इमारतीमुळे शहराच्या वैभवामध्ये भर पडली आहे. असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा लाभ उपेक्षित व गरजू लाभार्थ्यांना एकाच छताखाली मिळावा यासाठी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचं काम ही पूर्ण झालं आहे. लवकरच या इमारतीचं आपण लोकार्पण करणार आहोत. 12 तालुक्यांमध्ये कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत.

( हेही वाचा: खूशखबर! चंद्रपूरात टायगर सफारी सुरू होणार…)

माझी वसुंधरा अभियान राबवणार

जिल्ह्यात 69 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत. 1569 किलोमीटर लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत. आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 68 चा जिल्ह्यात 33 किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून 45 रूग्ण वाहिकांचे वाटप करण्यात आले. ग्रामविकास विभागाने नूकतेच 40 हजार कि.मी. रस्ते इष्टांकांपैकी 10 हजार किमी रस्ता बांधण्याचे काम हातात घेतले असून मंत्रीमंडळाने त्याला नूकतीच मान्यता दिली आहे. यामधून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची बांधणी चांगल्या प्रकारे होऊ शकते.अनुसूचित जाती घटक कार्यक्रमात अनुसूचित जातीच्या विकासासाठी 144 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात लवकरच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पाथर्डी व जामखेड येथे वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या नव उद्योजकांना स्टँड अप इंडिया योजनेत मदत मंजूर करण्यात आल्या आहेत.आदि वासी उपाय योजनेअंतर्गत आदिवासींच्या विकासा साठी अनेक योजना राबविण्यात आल्या. खावटी अनुदान वाटप योजनेत 27 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 8 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मंजूर करण्यात आला. असे ही श्री.मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.बांधकाम कामगारांसाठी शासनाने केलेल्या कामाबाबत बोलतांना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात बांधकाम उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या उद्योगात 24 हजार नोंदणीकृत कामगार कार्यरत आहेत. यातील 19 हजार कामगारांना आपण स्मार्ट कार्ड स्वरूपात ओळखपत्र दिले आहेत. या कामगारांसाठी शासनाच्या वतीने मध्यान्ह भोजन योजनेची सुरूवात माझ्या हस्ते 23 ऑक्टोंबर 2021 रोजी अहमदनगर येथे करण्यात आली. यातून 42 बांधकाम साईटवर 2930 बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन व रात्रीचे भोजन शासन मोफत दिले जात आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू, अवजारे खरेदीसाठी तसेच विविध योजनांतर्गत 6 कोटी 33 लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना 6515 पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे 12 हजार कोटी रूपये जमा असून त्याचे व्याज व महिना काठी मिळणारे सेस पाहता अद्याप बांधकाम कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वांनीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असे ही मुश्रीफ यांनी सांगितले.

महसूल प्रशासनाच्या कामाविषयी बोलतांना ते म्हणाले, महसूल प्रशासनाकडून ”ऑनलाईन सातबारा” व ”ई-पीक पाहणी” हा शासनाचा अभिनव उपक्रम उत्कृष्टपणे राबविला जात आहे. मार्च ते मे 2021 मध्ये झालेल्या गारपीट व अवकाळीमुळे बाधीत लोकांना 8 कोटी 48 लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या 38 हजार शेतक-यांसह इतर लोकांना 27 कोटी 89 लाख रूपयांचे अनुदान वितरीत केले आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात आपल्या जिल्ह्याने अतिशय चांगली कामगिरी केली. ही अभिनंदनीय बाब आहे. यापुढील काळातही माझी वसुंधरा अभियान लोकचळवळ होईल यासाठी आपण प्रयत्न करुया. शेतक-यांसाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत जनावरांसाठी गोठा बांधकाम, शेळीपालन शेड बांधकाम, रस्ता दुतर्फा लागवड, पाणंद रस्ते व इतर रस्ते, पोल्ट्री शेड, भूसंजीवनी नॅडेप कंपोस्टींग आदी कामे सुरु केली, असे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करत सामाजिक अंतर ठेवून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here